होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर : महापौर

अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर : महापौर

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:56AM

बुकमार्क करा
नवी मुंबई :  वार्ताहर 

लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक या सर्वांच्या योगदानातून नवी मुंबई शहर आज देशातील एक उत्तम शहर म्हणून नावाजले जात आहे. आगामी काळात अधिक चांगल्या नागरी सुविधा पुरवून अधिक अद्ययावत शहर निर्माण करण्यासाठी सारे मिळून प्रयत्न करु या, असा नव्या वर्षाचा संकल्प व्यक्त करत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नवीन वर्षात प्रत्येक विभागातील अपेक्षित कामांचे कॅलेंडर तयार करुन त्याची पूर्तता करण्याचे नियोजन करायला हवे, असे नमूद केले. 

नवी मुंबई महापालिकेच्या 26 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी आ. मंदा म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त डॉ.रामास्वामी एन. आदींसह मोठ्या संख्येने नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ. मंदा म्हात्रे यांनी, नवी मुंबई महापालिकेची आजची प्रगती पाहिल्यानंतर महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असे सांगितले. स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भिंती सुशोभित केल्यामुळे शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर दंड आकारावा अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी महापालिकेने आजवर केलेल्या प्रगतीबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगून पुढील काळात आणखी चांगले काम करुन नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्या म्हणाल्या.

आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी मागील 26 वर्षात नवी मुंबई महापालिकेची कामगिरी अतिशय चांगली असल्याचे सांगत भविष्यात इतर महापालिकांसाठी मागदर्शक होईल, अशा प्रकारचे काम नवी मुंबई महापालिकेकडून व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

मागील वर्षी स्वच्छतेत देशात 8 व्या क्रमांकावर असलेले आपले नवी मुंबई शहर यावर्षी देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रत्येक घटकाने स्वच्छता ही आपली दैनंदिन सवय व्हावी, याकरिता स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या 2018 च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.