होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : पोलिस मम्मींचा वाढदिवस उत्साहात

मुंबई : पोलिस मम्मींचा वाढदिवस उत्साहात

Published On: Jan 03 2018 8:32AM | Last Updated: Jan 03 2018 8:32AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

सांगलीत अनिकेत कोथळेला कोठडीत मारून त्याच्या मृतदेह जाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांमुळे राज्यात पोलिसांची प्रतीमा डागाळली असताना, वर्दीमध्ये दडलेल्या चांगल्या माणसाचे दर्शन मुंबई पोलीसातील अधिकारी आणि अंमलदारांनी मंगळवारी घडवले. निमित्त होते, माटुंग्यामध्ये एकट्या राहात असलेल्या ८४ वर्षीय वयोवृद्धा ललिता सुब्रमण्यम ऊर्फ पोलिस मम्मीच्या वाढदिवसाचे. माटुंगा पोलिसांनी मोठ्या उत्साहात पोलिस  मम्मीचा वाढदिवस साजरा केला.

माटुंग्यातील उषा अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत असलेल्या सुब्रमण्यम यांचे गेल्या २७ वर्षापासून पोलिसांशी जवळचे नाते जडले आहे. 1990 पासून सुरू झालेला एकाकी जीवनातून आनंदाकडे जाण्याचा  हा जीवन प्रवास माटुंगा पोलिस ठाण्यात नियुक्त होणारा प्रत्येक पोलिस अधिकारी आणि अम्मलदारांसोबत सुरू आहे. या वयोवृद्ध मातेची सेवा करण्यात सर्वच पोलिस धन्यता मानतात. सुब्रमण्यम या उच्चशिक्षित असून त्यांना दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना केमिकल इंजिनियर तसेच एमबीए पर्यंत शिक्षण दिले. मोठा मुलगा बाळा, मुलगी गोमती अमेरिकेला गेले. ते परतलेच नाहीत. तिसरा मुलगा मोहन आपल्या पत्नीसोबत बंगळुरूमध्ये राहतो. तेव्हापासून ही पोलिस मम्मी एकटी राहते. त्यातच त्यांना कंठाच्या आजाराने ग्रासले. 

वय झाल्याने मनात घाबरल्यासारखे होते. अशा प्रत्येक वेळेस त्या देवपूजेची घंटी फोनसमोर वाजवून पोलिसांची मदत घेतात. घंटी वाजली की माटुंगा पोलिस तात्काळ त्यांच्या घरी धाव घेत मदत करतात. 
मम्मींचा २ जानेवारी हा ८४ वा वाढदिवस माटुंगा पोलिसांनी धुमधडाक्यात साजरा केला. माझी मुले मला पैसे पाठवतात, मात्र मला भेटायला येत नाहीत. तीन मुले असूनही एक निराधार म्हणून जगण्याची वेळ माझ्यावर आली आहे. माटुंगा पोलिसांमुळे मी सुस्थितीत व सुरक्षित आहे ते माझी काळजी आपल्या आई प्रमाणे घेतात. सर्व पोलिस माझी मुले आणि माझा आधार आहेत असे सुब्रमण्यम (मम्मी) या वेळी म्हणाल्या.