Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथाडींचा कडकडीत बंद

माथाडींचा कडकडीत बंद

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:43AMनवी मुंबई : प्रतिनिधी  

महाराष्ट्रातील 36 माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मंगळवारी  तमाम माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांनी लाक्षणिक संप केला. या लाक्षणिक संपामध्ये नवीमुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील बाजार समित्यांच्या आवारातील,रेल्वे मालधक्का, ट्रान्सपोर्ट, किराणा, कापड, कापूस, मेटल व पेपर, लोखंड व पोलाद,जनरल विभागातील कामगार,सुरक्षारक्षक, गोदी कामगार आदी व्यवसायातील माथाडी कामगारांनी कामे बंद ठेवून लाक्षणिक संपामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने महाराष्ट्रातील 36 माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून एकच माथाडी मंडळ करण्यासाठी 17 जानेवारीच्या शासन निर्णयाव्दारे समितीची स्थापना करून या समितीवर माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून न घेता परस्पर निर्णय घेऊन माथाडी कायदा करणे व माथाडी मंडळांच्या योजना मोडीत काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ तसेच हा प्रयत्न थांबण्यासाठी माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांनी हा लाक्षणिक संप पुकारला होता.

या लाक्षणिक संपामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन, अखिल महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियन,मेटल बाजार संघ,कापड बाजार मराठा कामगार मंडळ,सुरक्षा रक्षक युनियन,कापड बाजार युनियन आदी युनियन सहभागी झाल्या होत्या.

माथाडी अ‍ॅक्ट,1969 अन्वये बृहन्मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्राकरिता व्यवसायनिहाय बोर्ड आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्रात जिल्हा बोर्ड अशा एकूण 36 माथाडी मंडळांच्या स्थापन झाली असून,ही मंडळे स्वायत्त आहेत. परंतु माथाडी मंडळाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्या करण्याकडे दुर्लक्ष करून शासनाने 36 माथाडी मंडळाचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे,त्याला सर्व कामगार संघटनांचा प्रखर विरोध आहे.

माथाडी मंडळे ही स्वायत्त असून,त्या मंडळाची त्रिपक्षीय रचना केलेली आहे,त्यात शासनाचे प्रतिनिधी, मंडळात नोंदीत असलेल्या मालकांचे आणि माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणा-या संघटनांचे प्रतिनिधींची नेमणूक करणे आवश्यक आहे. जेणेकरून माथाडी मंडळाच्या कामकाजाचे धोरणात्मक निर्णय त्रिपक्षीय मंडळासमोर घेता येतील. मात्र माथाडी मंडळे ही महामंडळ समजून त्यावर राजकिय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची नेमणूक करता येईल या दूषित हेतूने माथाडी मंडळे बरखास्त करून माथाडी कामगारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप माथाडी कामगार संघटनांनी केला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी मंगळवारी  पुकारलेला लाक्षणिक बंद यशस्वी करण्यास सर्व माथाडी कामगार संघटना,तमाम माथाडी कामगार व अन्य घटकांनी केलेल्या सहकार्याबद्दल माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे व संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.