Wed, Mar 20, 2019 02:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहिदांना मुंबईची मानवंदना

शहिदांना मुंबईची मानवंदना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना रविवारी मुंबईने मानवंदना दिली. या हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण झाली असली, तरी हल्ल्याच्या कटू आठवणी आजही तशाच जिवंत आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 164 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे 700 जण गंभीर जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालत पाकिस्तानी आतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. यात मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलातील प्रमुख अधिकार्‍यांसह 17 पोलीस जवानांना वीरमरण आले. या शहिदांना मुंबईतील आबालवृद्धांनी आपापल्यापरिने श्रद्धांजली वाहिली.

मरीन लाईन्स, पोलीस जिमखाना येथे सकाळी नऊच्या सुमारास राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर याच्यांसह पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची सायकल रॅली काढण्यात आली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, बॉम्बे जिमखाना, तसेच सामाजिक संस्थाकडून शहरात विविध ठिकाणी श्रद्धांजली आणि शहिदांना मानवंदना देण्यात आली. 

काळाघोडा परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी काढून 26/11 अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण शौर्यांजली वाहण्यात आली. यावेळी चार्ली चॅप्लिनच्या वेशभूषेतील कलाकाराने आपल्या खास अंदाजात हल्ल्याचा निषेध करत शोक व्यक्त केला. सीएसटी येथील वीर जवान स्मारक येथे एकत्रित जमून शेकडो तरुणांनी पणत्या पेटवून श्रध्दांजली वाहिली. सोशल मीडियावरही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार्‍या संदेशांची देवाण-घेवाण केली जात होती.