Fri, Apr 26, 2019 09:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादरला 23 व्या मजल्यावरून उडी घेत विवाहितेची आत्महत्या

दादरला 23 व्या मजल्यावरून उडी घेत विवाहितेची आत्महत्या

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

दादरच्या प्रभादेवी परिसरातील इमारतीच्या 23 व्या मजल्यावरून उडी घेत 28 वर्षीय उच्चशिक्षित नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. केतकी गवांडे असे मृत विवाहितेचे नाव असून गेली सात वर्षे ती मानसिक तणावाखाली होती. या घटनेची नोंद करत दादर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या केतकीचा दोन महिन्यांपूर्वीच एका जाहिरात कंपनीत उच्च पदावर असलेल्या ताडदेवमधील तरुणासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर ती पतीसोबत ताडदेव परिसरात राहू लागली. पती कामावर निघून गेल्यानंतर रोज सकाळी ती प्रभादेवीतील ट्विन टॉवरमध्ये माहेरी यायची. सायंकाळी पुन्हा घरी निघून जायची. असा दिनक्रम असलेल्या केतकीने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास याच टॉवरच्या 23 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरक्षारक्षकाकडून याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ तिला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 

दादर पोलिसांनी केतकीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. केतकीच्या कुटुंबीयांकडे केलेल्या चौकशीनुसार सात वर्षांपासून ती मानसिक तणावाखाली होती. मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते. याच तणावाखाली तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी कुटुंबीयांसह इमारतीतील रहिवासी, सुरक्षारक्षक यांचे जबाब नोंदविण्यात येत असून तपास सुरू असल्याचे दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी यावेळी सांगितले.