Tue, Sep 25, 2018 10:51



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पोलीस पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:33AM



डोंबिवली : वार्ताहर

माहेरून पैसे व सोने आणण्यासाठी पत्नीला शिवीगाळ व मारहाण करण्याबरोबरच तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनिल साळवी या पोलीस कर्मचार्‍यासह त्याच्या बहिणी विरोधात कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले.

भायखळा येथील पोलीस ठाण्यात हवलदारपदावर कार्यरत असलेला साळवे आपल्या कुटुंबासह कल्याणनजीक अटाळी येथे राहत होता. त्याचे सहा महिन्यांपूर्वी प्रगतीशी लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्न पाहणार्‍या प्रगतीला काही दिवसातच अनिल व त्याच्या बहिणीने माहेरून सोने व पैसे आणण्यासाठी मारहाण, शिविगाळ यासारखा त्रास देणे सुरू केले. या जाचाला कंटाळून प्रगतीने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.