Wed, Jul 24, 2019 08:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नाचे आमिष दाखवत वृध्देला ९.५ लाखांचा गंडा

लग्नाचे आमिष दाखवत वृध्देला ९.५ लाखांचा गंडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

वरळीतील बीडीडी चाळीत रहात असलेल्या 59 वर्षीय वृद्धेला लग्नाचे आमिष दाखवत एका ठगाने तब्बल साडेनऊ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  

बीडीडी चाळीत कुटूंबासोबत राहात असलेली पीडित वृद्धा ही अविवाहित असल्याने तिने 19 एप्रिल 2015 रोजी एका मराठी वृत्तपत्रात विवाहासाठी जाहीरात दिली होती. ही जाहीरात वाचून मधूकर आपटे नावाच्या व्यक्तीने स्थळाची चौकशी केली. ज्युपिटर केमिकल्स येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत असल्याचे सांगणार्‍या आपटे याने घटस्फोटीत असून मुलूंडमध्ये एकटाच राहात असल्याची बतावणी केली. तसेच आपला मुलगा नोकरीसाठी थायलंडला असल्याचेही त्याने सांगितले होते.

आपटेचा फोन येऊन गेल्यानंतर वृद्धेने ही बाब कुटूंबियांच्या कानावर घालत स्थळ योग्य वाटत असल्याचे सांगितले. काही दिवसांनी आपटेने फोन करुन या वृद्धेला भेटण्यासाठी वरळी नाका येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. ठरल्याप्रमाणे दोघे तेथे भेटलेही. या भेटीत आपटेने तिच्याकडून सर्व वैयक्तीक माहिती काढून घेतली. त्यानंतर मे 2015 पासून आपटेने या वृद्धेच्या घरी ये-जा सुरू करत कुटूंबियांशी जवळीक वाढवली. वृद्धेने आपटेकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, थायलंड येथून मुलगा मुंबईत येणार असून तो आधी लग्न करणार आहे. त्यानंतर आपण लग्न करु, असे सांगत आपटेने वेळ मारुन नेली. 

आपले लग्न होणार या आनंदात असलेल्या वृद्धेने त्याच्यावर विश्‍वास ठेवत, तुमचे घर बघायचे आहे अशी त्याच्याकडे मागणी केली. घरी कोणी नसते असे सांगून आपटेने तिला घरी नेणे टाळले. मात्र आपला बनाव या वृद्धेच्या लक्षात येणार नाही याची खबरदारी तो घेत होता. वृद्धा आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच आई आजारी असल्याचे कारण पुढे करत सप्टेंबर 2015 पासून आपटेने तिच्याजवळून 5 लाख रुपये उकळले. पैसे जात असल्याकडे वृद्धेचे लक्ष नव्हते. ती आपटेकडे केवळ लग्नाबाबत विचारणा करत होती.

आई बरी झाल्यानंतर काही दिवसांतच लग्न करु, असे सांगून आपटे वेळ मारुन नेऊ लागला. त्याची आई आजारी असल्याने वृद्धा त्याच्यावर लग्नाबाबत जबरदस्ती करत नव्हती. मे 2016 मध्ये आपटे पुन्हा घरी आला. रत्नागिरी येथील गावी एक प्लॉट खरेदी करावयाचा असून लग्नानंतर हा प्लॉट आपलाच होईल, असे सांगत आपटे याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. आपटेच्या जाळ्यात पुर्णपणे अडकलेल्या वृद्धेने त्याला तब्बल 4 लाख 50 रुपये दिले. त्यानंतर मात्र आपटे हा लग्नाबाबत काही एक बोलत नसल्याचे लक्षात येताच वृद्धेने दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली.

दरम्यानच्या काळात आपटेला बँकेतून ट्रान्सफर केलेल्या पैशांची नोंद अरुण गुरव या नावाने आल्याने वृद्धेला संशय आला. तीने याबाबत आपटेकडे विचारणा केली असता पैसे घेत असल्याबाबत मुलाला समजू नये म्हणून मित्र गुरव याचे बँक खाते वापरल्याचे थातुरमातूर उत्तर दिले. आपटेवरील संशय आणखी बळावू लागल्याने आणि तो विवाहास टाळाटाळ करु लागल्याने वृद्धेने पैशांची मागणी सुरू केली. अखेर आपटेने तिला 9 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र खात्यात पैसेच नसल्याने हा धनादेश वटला नाही.

वृद्धेने याबाबत आपटेकडे विचारणा केली असता अजून फंडाची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने हा धनादेश वटला नसल्याची बतावणी केली. तसेच एप्रिल 2017 मध्ये आई वारल्याचेही त्याने वृद्धेला सांगितले. काही महिने उलटल्यानंतर वृद्धेने आपटे याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धेने आपटेचा शोध सुरू केला. त्याचा विलेपार्ले येथील मित्र गुरव याच्या घरी जाऊन चौकशी केली असता आपटे नावाचा व्यक्ती ओळखीचा नसल्याचे त्याच्या कुटूंबियांनी सांगितले.

Tags : mumbai news,Marriage, bait, older woman, Fraud,


  •