Wed, Sep 19, 2018 22:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तहानला!

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तहानला!

Published On: Mar 12 2018 1:24AM | Last Updated: Mar 12 2018 1:04AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

जलसिंचन आणि जलयुक्त शिवाराची मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचा सरकार दावा करत असले तरी उन्हाळ्याच्या तोंडावरच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा व यवतमाळ हे जिल्हे तहानले आहेत. कडक उन्हाळा सुरु होण्यास अद्याप तीन महिने बाकी असताना आतापासुनच टंचाईच्या झळा बसु लागल्याने यंदा राज्यावर पाणी कपातीचे वादळ घोंगावण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात धरणं धो-धो वाहुन लागल्याचे पाहुन राज्यात यंदा पाणी टंचाई भासणार नाही, असा दावा सरकारकडुन दरवर्षी करण्यात येतो. मात्र, तो नेहमीच फोल ठरत आला आहे. दरवर्षी सरकारला एप्रिलमध्ये टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागतो. पण यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच टंचाई निर्माण झाल्याने सरकारला मेपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, बीड, हिंगोली, लातूर,उस्मानाबाद तसेच विदर्भातील वाशिमसह नागपुर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. मात्र, हे चित्र असेच राहील, अशी हमी दिली जात नाही.

या जिल्ह्यांमधील गावे आणि वाड्यांनाही काही प्रमाणात टंचाईच्या झळा बसु शकतात, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागातील एका अधिकार्‍याने दिली. टंचाईच्या दिवसांमध्ये लोकांना पाणीपुरवठा वेळेवर करण्याबाबत खबरदारी घेण्याची सूचना संबधीत जिल्ह्याधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.