Wed, Aug 21, 2019 14:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी अभिमान गीतावरून सरकारची कोंडी

मराठी अभिमान गीतावरून सरकारची कोंडी

Published On: Feb 28 2018 1:43AM | Last Updated: Feb 28 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी अनुवादक नसल्याने टीकेचा सामना करावा लागलेल्या राज्य सरकारची मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन समारंभात लाऊड  स्पिकर बंद पडल्याने पुन्हा एकदा कोंडी झाली. विधानभवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आयोजित कार्यक्रमात कवीवर्य सुरेश भट लिखित सामूहिक मराठी भाषा अभिमान गीत सुरु असतानाच स्पिकर बंद पडला. त्याचबरोबर सरकारने अभिमान गितातील सातवे कडवे मुद्दाम वगळल्याचा आरोप करीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब झाले. 

मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून मराठी अभिमान गीत गायनाचा कार्यक्रम विधानभवन प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. 

सुप्रसिध्द संगीतकार कौशल इनामदार अभिमान गीत गाण्यासाठी आपल्या सहकार्र्‍यांसह प्रांगणात गीत गात होते. मात्र,  अभिमान गीताच्या अखेरच्या कडव्यावेळी लाऊड स्पिकरच बंद पडला. प्रसंगावधान राखून कौशल इनामदार यांनी अभिमान गीत पूर्ण केले. मात्र, या मुद्यावरुन विरोधकांना आक्रमक होण्याची दुसर्‍या दिवशीही संधी मिळाली. त्यातच विरोधकांनी अभिमान गीतामधील सातवे कडवे सरकारने गाळल्याचा आरोप करीत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

विधानसभेचे कामकाज सुरु होताच याप्रश्‍नावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लाऊड स्पीकर बंद पडण्याची आणि गौरव गीतातील सातवे कडवे वगळून मराठी भाषा दिनीच मराठीचा खून करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप केला. सरकारने याप्रश्‍नी पुन्हा सभागृहाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनीही या नामुष्कीबद्दल राज्य सरकारने माफी मागावी अशी मागणी केली.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरी हाल सोसते मराठी
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी 

हे कडवं सरकारला अडचणीचे वाटत असल्याने ते अभिमान गीतामधून वगळण्यात आले. हा मराठी आणि कवीवर्य सुरेश भट यांचा अपमान आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गीत सुरेश भटांनी आम्हाला उद्देशून लिहीलेले नाही. त्यांनी हे गीत लिहीले तेव्हा तुमचे सरकार होते, असा पलटवार केला. तर, भाजप आमदार मेधा गाडगिळ यांनी सुरेश भटांच्या मूळ कवितेत सात कडवी असली तरी सुरेश भटांच्या सांगण्यावरुन अभिमान गीतांमध्ये सहा कडव्यांचा समावेश झाल्याची माहिती सभागृहात दिली. मात्र, विरोधकांनी गोंधळ घातल्याने सुरुवातीला पंधरा व नंतर पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले. शेवटी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी सुरेश भट यांच्या काळातच सहा कडव्याच्या गीताला मान्यता देण्यात आली असल्याने सातवे कडवे वगळल्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे सांगत या गोंधळावर पडदा टाकला.