Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील मराठी माध्यमाच्या ९ शाळा बंद !

मुंबईतील मराठी माध्यमाच्या ९ शाळा बंद !

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

विद्यार्थी पटसंख्या घसरल्यामुळे पालिकेने पश्‍चिम उपनगरांतील 18 शाळा बंद केल्या आहेत. यातील 9 शाळा या मराठी माध्यमाच्या असून यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या शून्यावर आली  आहे. त्यामुळे पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे भवितव्य अंधारात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत दोन दशकांपूर्वी पालिकेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालण्यासाठी पालकांचा कल होता. पण गेल्या काही वर्षात पालिका शाळांपेक्षा पालक खाजगी शाळांना प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत. 

दरवर्षी किमान 10 शाळा अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करून बंद करण्यात येत आहेत. 2018-19 या शैक्षणिक वर्षात पश्‍चिम उपनगरांतील 18 शाळांचे अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. याला विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरणे हे एकमेव कारण आहे. बंद करण्यात आलेल्या 18 शाळांमध्ये 9 शाळा मराठी माध्यमाच्या असून अन्य शाळा गुजराती, उर्दू, तेलगू व तमिळ माध्यमाच्या आहेत. 
गेल्या पाच वर्षात या शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येचा अभ्यास करण्यात आला. यात पाच वर्षात ओशिवरा मराठी शाळा, एसआरपी कॅम्प मराठी शाळा, मढ तेलगू शाळा, पुष्पापार्क उर्दू शाळा, कस्तुरबा क्रॉसरोड गुजराती शाळा, गणेशनगर तमिळ शाळा यांची पटसंख्या शून्यावर आली होती. 

महात्मा गांधी, उन्नत नगर, मुद्रण कामगार नगर, बांद्रा पेटीट, डी. एन. नगर आदी मराठी माध्यमाच्या शाळांचे अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करून त्या बंद करण्यात आल्या. अंधेरी पश्‍चिमेकडील शासकीय वसाहतीत असणार्‍या मुद्रण कामगार नगर या मराठी शाळेत 2013-14 या शैक्षणिक वर्षात 48 विद्यार्थी होते. 

पाच वर्षांत या विद्यार्थ्यांची संख्या 25 वर आली. त्यामुळे या शाळेचे डी. एन. नगर मराठी शाळा क्रमांक 1 मध्ये विलीनीकरण करण्यात आले. ही शाळा मुद्रण कामगार नगर शाळेपासून सुमारे 3 किमी दूर आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान कमी पटसंख्येत शाळा चालवणे शक्य नसल्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.