Thu, Feb 21, 2019 09:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान : काँग्रेस

बेस्टमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान : काँग्रेस

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी 

शासकीय व महानगरपालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा 100 टक्के वापर झालाच पाहिजे, तसा कायदाही आहे. पण सेनेची गेली 20 वर्षे सत्ता असलेल्या बेस्ट उपक्रमात मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्यात येत आहे. सेनेचा प्रशासनावर अंकुश न राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप काँग्र्रेसने केला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठीची गळचेपी सहन करू नका, असा आदेश आपल्या शिवसैनिकांना दिला आहे. त्यानंतर नगरसेवकांसह शिवसैनिक मराठी भाषा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.  पण दुसरीकडे बेस्ट उपक्रमात शिवसेनेची सत्ता असतानाही शनिवारी इंग्रजी भाषेत प्रेसनोट काढून शिवसेनेच्या इशार्‍याला फारसे महत्त्व दिलेले नाही. बेस्टच्या जनसंपर्क विभागाने वीज खंडित झाल्यानंतर कंट्रोलरूमला संपर्क साधण्याचे चक्क इंग्रजी भाषेत आवाहन केले आहे. विशेष म्हणजे संपर्क साधन्यासाठी दूरध्वनी क्रमांकासह मोबाईल नंबर दिले आहेत. बेस्टचे बुहूतांश ग्राहक मराठी भाषिक असताना, इंग्रजी भाषेत आवाहन केल्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. बेस्टमध्ये प्रेसनोटच नाही तर अनेक परिपत्रक, प्रशासनाकडून करण्यात येणारा पत्रव्यवहार इंग्रजी भाषेत केला जातो. केवळ बेस्ट समितीत येणारे प्रस्ताव वगळता, 70 टक्के कामकाज इंग्रजी भाषेत चालत आहे. पण सेनेचे याकडे लक्षच नाही.