Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत ‘धावणार’ मराठी तरुणांची कल्पना

मुंबईत ‘धावणार’ मराठी तरुणांची कल्पना

Published On: May 11 2018 9:28AM | Last Updated: May 11 2018 9:28AMमुंबई : प्रतिनिधी

ओला आणि उबर या कंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात मराठी तरुण एकत्र आले आहेत. या तरुणांनी काही संघटनांना एकत्र करुन सह्याद्री स्मार्ट प्रायव्हेट लिमिटेड (एस 3) नावाने नवीन टॅक्सी सेवा 12 मे पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यामुळे प्रथमच मराठी तरुणांनी चालवलेल्या या उपक्रमामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या एका वर्षापासून प्रफुल्ल शिंदे आणि राजेश काळदाते हे दोन मराठी तरुण नवीन टॅक्सी सेवेची संकल्पना घेऊन फिरत होते. मात्र त्याला आर्थिक साथ मिळत नव्हती. अखेर काही महिन्यांअगोदर ती साथ भारत फ्रेटने दिली आणि पुढील आठवड्यात ही टॅक्सी सेवा रस्त्यावर येण्यास सज्ज झाली आहे.

अर्थात कल्पना मराठी तरुणांची असली तरी आता या एस थ्री कॅबची सर्व सूत्रे सह्याद्री स्मार्ट सेफचे संचालक सोहेल कझानी यांच्या हाती आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या टॅक्सी सेवेत दाखल झालेल्या 800 वर चालकांपैकी 700 चालक ओला, उबरचेच आहेत. ही टॅक्सी रस्त्यावर धावण्यापूर्वी या सेवेतील टॅक्सींची संख्या हजारांवर जाईल आणि पुढील दोन महिन्यांत दोन हजारांचा टप्पा गाठला जाईल. मुंबई शहरात काळीपिवळी टॅक्सीसह, टॅब कॅब, मेरु, ओला, उबर यांच्या मनमानी भाडेवसुलीमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. ओला उबरचा विस्तार थेट कल्याण, वसई, विरार व पनवेलपर्यंत झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस ओला, उबरची सेवा नागरिकांना लाभदायक ठरत होती, मात्र काही दिवसातच त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ओला-उबरच्या व्यवसायात अनेक बेरोजगार मराठी तरुण पुढे आले. अनेकांनी दागदागिने विकून नवीन गाड्या विकत घेतल्या, मात्र कंपनीकडून मिळणार्‍या कमिशन व अन्य फायद्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे अनेकांना गाडीचा मासिक हप्ता भरण्या इतपत आमदनी मिळत नव्हती. त्यामुळे ओला, उबरच्या फसव्या आश्‍वासनामुळे मोठा तोटा झाला. ओला, उबरच्या आश्‍वासनांना भुललेल्या तरुणांनी एकत्र येत ही नवी सेवा सुरू केली आहे. 

या प्रकल्पासाठी विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये फक्त 1 कोटीची गुंतवणूक केल्याचे सांगत कझानी यांनी टॅक्सी सेवा देतानाच आपली नजर मुंबईतील कुरिअर सेवेवर असल्याचेही अधोरेखित केले आहे. एकट्या मुंबईत रोज एक लाखाहून अधिक कुरिअर फिरतात आणि अजूनही संपूर्ण गरज भागवली जात नाही. या कॅबच्या माध्यमातून या कुरिअर सेवेतही उतरण्याचा विचार होत आहे.  

दृष्टिक्षेपात एस-3 कॅब

> विशेष म्हणजे यात केवळ मोबाईल अ‍ॅपद्वारेच नाही, तर कॉल करूनही आपण टॅक्सी बोलावू शकतो. ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल.

> दुसरीकडे ओला-उबरपेक्षा कमी भाडे या सेवेमध्ये आकारले जाईल आणि भाडे पद्धती देखील वेगळी असेल, असा दावा संस्थापकांनी केला आहे.

> आत्ताच 800 हून जास्त चालकांनी या कंपनीमध्ये आपली नोंदणी केली आहे.

> 10 टॅक्सी युनियनने आपला पाठिंबा दर्शवून चालक देणार असल्याचे सांगितले आहे.

> या युनियन्समध्ये महाराष्ट्र टूरिस्ट परमिट टॅक्सी युनियन, खालसा ग्रुप टॅक्सी युनियन, स्वयंसेवा संस्था टॅक्सी युनियन, ड्रायव्हर वेल्फेअर असोसिएशन, ड्रायव्हर एकता ग्रुप, टूरिस्ट टॅक्सी चालक-मालक संघटना आणि सत्संग ग्यान मंडल टॅक्सी युनियन यांचा समावेश आहे.

> सध्या तरी केवळ मुंबईमध्येच ही सेवा असेल. मात्र येणार्‍या काळात इतर शहरातही ही सेवा सुरू होईल.