Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी विकिपीडिया @ ५०,०००

मराठी विकिपीडिया @ ५०,०००

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 12:53AMठाणे : प्रतिनिधी 

माहितीच्या महाजालातील ज्ञान आणि माहितीचा सर्वात मोठा कोश अर्थात विकिपीडियावर मराठी भाषेचे योगदान वाढावे यासाठी मराठी विकिपीडियाने केलेल्या आवाहनाला मराठीजनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात मराठी विकिपीडियावर विविध विषयांवरील सुमारे 50 हजारांहून आधिक लेख प्रकाशित झाले आहेत.

मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या जगभरातील मराठीप्रेमींनी विकिपीडियाच्या महाजालात आपले योगदान दिले आहे. मराठी विकिपीडिया गेली 15 वर्षांपासून कार्यरत आहे. महिती ज्ञानाच्या या स्त्रोताचा वापर आधिकधिक व्हावा, त्याचबरोबर या महाजालांवर वैविध्यपूर्ण माहिती प्रकाशित व्हावी, माहितीचा संग्रह वाढावा यासाठी विकिपीडिया प्रयत्नशील आहे. विकिपीडियाच्या प्रयत्नांना मराठी भाषिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे इंडिया विकिपीडियाचे अध्यक्ष व मराठी विकिपीडियाचे प्रचालक राहुल देशमुख यांनी दै. पुढारीला सांगितले.

महाजालावरील अफाट विश्वात उपलब्ध असलेल्या माहिती व ज्ञानाच्या आवाक्याशी मराठी विकिपीडिया या सांकेतिक स्थळाची तुलना केल्यास  मराठी विकिपीडिया अद्याप बाल्यावस्थेत आहे. परंतु, महाजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती व ज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये  हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका पार पाडतात, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे स्वामित्व हक्क मुक्त केल्याने त्यातील सर्व माहिती आता मराठी विकिपीडियावर आणण्याचे काम वेगात सुरू असल्याचे देशमुख म्हणाले.