Sat, Aug 24, 2019 21:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, नवी मुंबईत ‘मराठा बंद’चा उद्रेक

मुंबई, नवी मुंबईत ‘मराठा बंद’चा उद्रेक

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 1:06AMमुंबई/नवी मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मराठी क्रांती मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात कडकडीत बंद पाळला गेला. तब्बल 45 ठिकाणी उग्र आंदोलने करण्यात आली. मात्र, अचानक उद्रेक झाला आणि या आंदोलनाला प्रामुख्याने नवी मुंबईत आणि मुंबई, ठाण्यातही हिंसक वळण लागले. कोपरखैरणे आणि कळंबोलीत हिंसाचाराचा अक्षरश: आगडोंब उसळला आणि आंदोलकांनी पोलिसांच्या तीन गाड्या तोडफोड करीत पेटवून दिल्या, तर कोपरखैरणेत डी मार्ट येथील पोलीस चौकीही जाळण्यात आली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला अश्रुधूर आणि नंतर हवेत गोळीबार केला.

आंदोलकांच्या दगडफेकीत डीसीपी डॉ. राजेंद्र माने, राजेश बनसोडे, पीआय देविदास सोनावणे यांच्यासह 15हून अधिक पोलीस जखमी झाले. यात पोलीस कर्मचारी मनोज जाधव यांना अधिक दुखापत झाली आहे. जोगेश्‍वरीत रेल रोको झाल्याने लोकल विस्कळीत झाली. मुंबईत 21 बेस्ट बसेस फोडण्यात आल्या, तर एका ठिकाणी बसला पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न झाला. ठाण्यातही मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावर दोन ठिकाणी जमावाने रास्तारोको करीत पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत चार पोलीस अधिकार्‍यांसह सहा जखमी झाले तर पोलिसांच्या दोन गाड्या आणि टीएमटीच्या आठ बसेस फोडण्यात आल्या. आंदोलनात समाजकंटक घुसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अखेर लाठीजार्च करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून दंगेखोरांना पांगविले आणि 20 जणांना अटक केली. कल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद पाळण्यात आला आणि दगडफेकीचे तुरळक प्रकार घडले. शिवाजी चौकातील ठिय्या आंदोलनाने दिवसभर वाहतूक ठप्प राहिली. 

नवी मुंबई, मानखुर्द,  कळंबोली आणि  ठाण्यात सकाळी दहा वाजता मराठा आंदोलनाला सुरूवात झाली.  पहिली ठिणगी ठाणे वर्तकनगर नाक्यावर टीएमटी बसच्या काचा फोडून पडली.  त्यानंतर मानखुर्दमध्ये बेस्ट बस जाळण्यात आली. हे लोण वाशी खाडीपुलावरून कोपरखैरणे विभागात पोहचले. सायन - पनवेल महामार्गावर सुरूवातीला रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. टायर, वाहने  जाळण्यात आली. याच महामार्गावर कळंबोलीच्या मॅकडोनाल्डवर हल्‍ला करण्याच्या तयारीत असलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलन चिघळले. बघता बघता आंदोलकांनी पोलिसांची जीप जाळली व अन्य तीन वाहने पेटवून दिली. लाठीमार, अश्रुधुरानेही जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांनी अखेर हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी आणखी भडकली. आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या तरुणांनी थेट पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरू केली. सुमारे अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. 

अशा परिस्थितीत एसआरपीएफ प्लाटून रस्त्यावर उतरल्यानंतर एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजूची वाहतूक धीम्या गतीने का होईना पोलिसांनी सुरू केली होती. ती तीनवेळा थांबविण्यात आली. हे पाहून आंदोलक कळंबोली शहरात घुसले. तेथून पोलिसांना टार्गेट करत त्यांनी पुन्हा दगडफेक सुरू केली. सुमारे 500 पोलीस, 11 पीआय, 4 एसीपी, दोन डीसीपी यावेळी घटनास्थळी हजर होते. पोलीस एकीकडे या आंदोलकांना तोंड देत असतानाच कोपरखैरणेतही सायंकाळी सहाच्या सुमारास  पुन्हा  दगडफेक  झाली. आंदोलकांचे टार्गेट होते कोपरखैरणे पोलीस ठाणे. आंदोलकांनी इथे हातात सापडेल ते वाहन जाळले, पोलीस चौकी पेटवून दिली.  

तत्पूर्वी सकाळी वाशी, कोपरखैरणे,पनवेल-कळंबोली आणि कामोठे येथे शांततेत आंदोलनाला सुरूवात झाली होती. मात्र नंतर  पनवेलमध्ये रास्ता रोको करण्यात आले. पनवेल एसटी स्थानकात आंदोलकांनी एसटी सेवा बंद पाडण्यास भाग पाडले. त्यानंतर कामोठे वसाहतीत मोर्चा काढून सर्व व्यवहार बंद केले. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. रस्त्यावर टायर जाळून वाहतुकीची कोंडी करण्यात आली.  

नवी मुंबईच्या इतर भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. महापालिकेच्या परिवहन विभागाने अनेक ठिकाणची बस सेवा बंद ठेवली होती. वातानुकूलित 67 बस तर आगाराबाहेर काढण्यात आल्याच नाहीत. महापालिकेच्या एकूण 320 बसेसपैकी 50 बस धावत होत्या. सीबीडी बेलापूर येथे महत्वाची कार्यालये असल्यामुळे तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोपरखैरणे येथे काही भागात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक बंद पाडली.  रिक्षाही तुरळक ठिकाणीच धावताना दिसत होत्या.

शाळा मात्र सुरळीतपणे सुरू होत्या. काही ठिकाणी शाळेच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या त्यामुळे पालकांना धावाधाव करावी लागली. त्यातच रिक्षांचे प्रमाणही कमी असल्याने पालकांचे हाल झाले. मुंबईत सकाळपासूनच आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन दुकाने आणि वहातूक व्यवस्था बंद करण्यास सुरुवात केली. दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, जोगेश्‍वरी, मुलुंड, दहिसर चेकनाका, चेंबूर, भायखळा, लालबाग आदी ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. परळ, लालबाग, दादरसारख्या मध्यमुंबईसह अनेक भागातील दुकानदारांनी स्वत:हून बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे दुकाने आणि बाजारपेठा बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा बाजूला ठेऊन बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसले.   

दादर पूर्व ते हिंदमाता परळ परिसरात मराठा कार्यकर्त्यानी रॅली काढून सकाळी वातावरण निर्मिती केली. त्यानंतर मुंबईच्या अनेक भागातील कार्यकर्ते एकत्र जमून बंदचे आवाहन करताना दिसत होते. जोगेश्‍वरीचा सुमारे वीस मिनिटांचा रेलरोको वगळता पश्विम उपनगरातील वांद्रे, खार सांताक्रूझ, विलेपार्ले अंधेरी या परिसरात बंद शांततेत पार पडला. त्यामुळे रस्त्यावर नेहमी प्रमाणे वाहनांची ये जा कमी असल्याचे जाणवले. दहिसर चेकनाका, वाशी चेकनाका येथे संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. सकाळी जोगेश्वरीतील रेल रोको बरोबर स्थानिक परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

बेस्टच्या 21 बसेसवर दगडफेक !

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा बेस्ट उपक्रमालाही मोठा आर्थिक फटका बसला. दिवसभरात ठिकठिकाणी 21 बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तर पाटील नगर, मानखुर्द येथे पेट्रोलच्या बाटल्या टाकून, बस जाळण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. पण अग्निशमन दल वेळीच पोहचल्यामुळे बसला लागलेली आग विझवण्यात आली. या घटनांमुळे बेस्टचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बेस्टने काही भागातील बससेवा सकाळनंतर बंद ठेवली होती. 

मराठा आंदोलकांनीही पहाटेपासून बेस्टच्या बसला टार्गेट केले. सांताक्रूझ ते नेरूळला जाणारी 517 क्रमांकाची बस पाटील नगर, मानखुर्द येथे दुपारी 1.30 वाजता येताच काही आंदोलकांनी बसवर पेट्रोलच्या बाटल्या फेकून बस पेटून देण्याचा प्रयत्न केला. चालक व वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरून सुरक्षित स्थळी नेले. पेट्रोलमुळे बसने पेट घेतला. यात सहा ते सात आसने जळून खाक झाली. पण बसने पेट घेण्याआधीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्यामुळे बेस्टचे मोठे नुकसान टळले. 

चांदीवली कॉर्टर येथे सकाळी 335 व 359 क्रमांकाच्या बसवर दगडफेक करण्यात आली यात पुढील काचांचे नुकसान झाले. कुर्ला बैल बाजार, जम्बो दर्शन अंधेरी, सफेद पूल कमानी, हनुमान नगर कांदिवली, साखीनाका, मोरवा बस स्टॉप चांदिवली, आयटी पार्क गोरेगाव पूर्व, श्रेयस सिनेमा घाटकोपर, कमानी, वाशी पूल आदी ठिकाणी बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. बसच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन त्याचा अहवाल लवकरच बेस्ट समितीत सादर करण्यात येईल, असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

पश्चिम उपनगरांत शांततेत 

पश्‍चिम उपनगरांतील मराठा बांधवांनी बेस्ट बस, अ‍ॅटो रिक्षा आणि खाजगी वाहने बंद करण्यास सकाळपासूनच सुरुवात केली होती. यामुळे सकाळी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना रिक्षा आणि बेस्ट बस अभावी माघारी परतावे लागले. परंतु या बंदमधून शाळा, महाविद्यालय यांना वगळण्यात आल्याने शाळेच्या बसेस मात्र सुरू होत्या. कांदिवली येथील वडारपाडा, हनुमान नगर याठिकाणीही मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी भर रस्त्यांवर ठिय्या आंदोलन करून बेस्ट बस, अ‍ॅटो रिक्षा आणि दुकाने बंद केली. या संपुर्ण आंदोलनात कुठेही तोडफोड, मारहाण किंवा हिंसाचार झाला नाही. 

दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने

भायखळा परिसरात सकाळी 9 च्या सुमारास शांततेत आंदोलनाला सुरुवात झाली. भायखळा, घोडपदेव, काळाचौकी परिसरात मोर्चेकरी शांततेने दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते.  चिंचपोकळी करीरोड भारतमाता या परिसरात कोणतेही नुकसान न करता मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा घोषणा देत या तीन विभागात हातात झेंडे घेऊन आंदोलक रस्ता रोको करणार होते. परंतू पोलिसांनी मध्यस्थी केली. आंदोलकांना त्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. नेहमी गजबजलेल्या लालबागमध्ये दुकाने बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला.

दादर पासून हिंदमाता परिसर भगवामय झाला होता. मराठा आंदोलक टायर जाळणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवला.  परळ विभागात अनेक रुग्णालयात असल्यामुळे हिंदमाता परिसरातून जाणार्‍या रुग्णवाहीकांना मराठा मोर्चाचे समन्वयक वाट मोकळी करून देत होते. प्लाझा चित्रपटगृहाजवळही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करण्यात आला. या रस्तारोकोमध्ये एका बेस्ट बसव दगडफेक करण्यात आली. दादर , शिवाजीपार्क, प्रभादेवी, माहिम परिसरातील दुकाने बंदच होती.

दिवसभरात

  • मुंबई : 45 ठिकाणी आंदोलन; 447 जण ताब्यात, ट्रान्सहार्बर मार्ग, ठाणे -वाशी, ठाणे - नेरूळ मार्ग ठप्प
  • मुंबई : मानखुर्द येथे पेट्रोलच्या बाटल्या टाकून बस जाळण्याचा प्रयत्न
  • नवी मुंबई : आंदोलकांकडून रास्ता रोको; जोरदार दगडफेक, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, हवेत गोळीबार, इंटरनेट सेवा काही तास बंद, घणसोलीत रेलरोको आंदोलन
  • ठाणे : नितीन कंपनीजवळ आंदोलकांकडून दगडफेक, आंदोलकांनी पूर्वद्रुतगती महामार्ग रोखून धरला. लाठीचार्ज अन् अश्रुधुराचाही आंदोलकांवर मारा.
  • कल्याण : शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन, रिक्षा, बसेसची तोडफोड.
  • बीड : भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घर आणि कार्यालयावर दगडफेक.
  • नाशिक : दगडफेकीच्या घटना, एटीएम फोडले; शाळा व महाविद्यालयांना सुट्टी. गंगापूर धरणात उतरणारे 20 कार्यकर्ते ताब्यात
  • अहमदनगर : बाजारपेठ पूर्ण बंद; कर्जत येथे आंदोलक रस्त्यावर, वन विभागाची जीप जाळली, एसटी सेवा काही काळ ठप्प