Fri, Nov 16, 2018 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी गौरव गीतावरुन फडणवीस-जयंत पाटील यांच्यात जुंपली

मराठी गौरव गीतावरुन फडणवीस-जयंत पाटील यांच्यात जुंपली

Published On: Feb 27 2018 12:01PM | Last Updated: Feb 27 2018 12:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्‍या दिवसापासून सत्‍ताधारी  आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. पहिल्‍या दिवशी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्‍याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मराठी अभिमान गीतावरुन विधीमंडळात विरोधकांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाना साधला. मराठी भाषा दिनी सरकारकडून विधीमंडळातील कार्यक्रमात गौरव गीतातील शेवटचे कडवे गाळल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्‍ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याच चांगलीच जुंपली. 

मराठी भाषा दिनानिमित्‍त आज विधीमंडळाच्या प्रांगणात विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण करून ‘‘लाभले आम्‍हास भाग्‍य मराठी’’ या अभिमान गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. मात्र, या गीतात सात कडवी असून त्‍यातले शेवटचे कडवे गाळल्‍याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 

गौरव गीतातील अखेरचे कडवे गाळण्यात आल्याचे सांगताना माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, ‘‘या कडव्यात मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे वर्णन करण्यात आले आहे. हे कडवे वगळून सरकारने मराठीचा अपमान केला आहे. हे कडवे वगळण्याचा अधिकार तुम्‍हाला कोणी दिला? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. 
जयंत पाटलांच्या आरोपानंतर देवंद्र फडणवीस यांनी गीत कधी लिहले आहे, याची खात्री करा, असे प्रत्त्युत्तर दिले. फडणवीसांच्या भूमीकेनंतर सभागृहात  सरकारने माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली. सभागृहातील गोंधळामुळे सभापतींनी कामकाज स्थगित केले.  

‘‘मराठी भाषा दिनी मराठी अभिमान गीताचा अपमान झाल्‍याचा’’ आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.