Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीः उत्पन्नमर्यादा ८ लाख

मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीः उत्पन्नमर्यादा ८ लाख

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 1:05AMमुंबई : विशेष प्रतिनिधी  

मराठा समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये एम.बी.बी.एस. आणि बी.डी.एस.चे शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून 8 लाख करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजातील तरुणांच्या वैद्यकीय शिक्षणातील अडचणी दूर होणार आहेत.

आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून 8 लाख करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महसूल तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी 28 जून रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्यातील सर्व शासकीय अनुदानित तथा विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आली आहे. 

चालू शैक्षणिक वर्षात शासकीय अनुदानित तथा विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम. बी. बी. एस. आणि बी.डी.एस. अभ्यासक्रमासाठी आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरून प्रवेश घेता येणार आहेत. महाविद्यालयांनाही निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.