होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्र्यांच्या वक्‍तव्यांमुळे आंदोलन भडकले : विरोधकांचा आरोप

मंत्र्यांच्या वक्‍तव्यांमुळे आंदोलन भडकले : विरोधकांचा आरोप

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बोलविलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत विरोधकांनी मंत्र्यांच्या वक्‍तव्यांवर नाराजी व्यक्‍त करीत ही वक्‍तव्येदेखील आंदोलन भडकण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला. 

यावेळी अजित पवार म्हणाले, मराठा समाजात मागण्यांसाठी अस्वस्थता निर्माण झाली असताना वातावरण शांत करण्याऐवजी मंत्रीच ते भडकवित आहेत. कोण मंत्री साप सोडण्याची भाषा करीत आहे, तर कोणी आरक्षणाची फाईल चुटकीसरशी मंजूर केली असती, अशी वक्‍तव्ये करून संभ्रम वाढवित आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारीमध्ये साप सोडण्याबाबतचे संभाषण टेप केल्याचे म्हटले आहे. जर हे खरे असेल, तर ते जाहीर करा आणि ज्यांचे हे संभाषण आहे त्यांच्यावर कारवाई करा; पण उगाच वाद वाढेल असे काही बोलू नका, असे सांगितले.

उशिरा सुचलेले शहाणपण : विखे-पाटील

मराठा आरक्षणावर सरकारने शनिवारी बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.  राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल लवकरात लवकर तयार केला जावा, यासाठी सरकारकडून पुरेसा पाठपुरावा व उपाययोजना झालेली नसल्याचे आम्ही यावेळी निदर्शनास आणून दिले. मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या निरपराध नागरिकांवर 353, 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याची तक्रार आम्ही यावेळी केली. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने समाजकंटक वगळता अन्य सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

अधिवेशनाची सूचना उद्धव ठाकरेंची : रामदास कदम 

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वर्षापूर्वीच केली होती. ही सूचना तेव्हाच ऐकली असती तर आजची वेळ आली नसती, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनीही मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी आधी केलेली सूचना आता मान्य झाली, असे सांगितले.