Tue, Apr 23, 2019 23:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामासत्र

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामासत्र

Published On: Jul 27 2018 1:48AM | Last Updated: Jul 27 2018 1:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाची मागणी आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील आमदारांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आज आणखी पाच आमदारांनी राजीनामे दिल्याने राजीनाम्यांची संख्या सात झाली आहे. आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.

सकल मराठा समाजाने शांततेत आणि शिस्तीत 58 मार्चे काढल्यानंतरही मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटू न शकल्याने मराठा समाजाने क्रांती मोर्चाचे रूपांतर ठोक मोर्चात केले आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यभर आंदोलन पेटले आहे. काही ठिकाणी या मोर्चाला हिंसक वळण लागले. राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल, तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत कन्‍नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम आपला राजीनामा सादर केला. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठविला. वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही आपला राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी गोदावरीत जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे हे चिकटगावकर यांच्या मतदार संघातील होते.

भालके, कदम यांचे राजीनामे, आ. भरणे यांचा राजीनामा

राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक व शासकीय नोकरीत आरक्षण मिळावे, म्हणून इंदापूरचे आ. दत्तात्रय भरणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला. इंदापूर तहसील कार्यालयासमोर इंदापूर तालुका सकल मराठा मोर्चाच्या वतीने सलग दोन दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आमदार दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनास व्यक्‍तिगत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आणि महादेव कोळी यांच्या आरक्षणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे भालके यांनी म्हटले आहे. मोहोळचे आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी तुरुंगातूनच आपला राजीनामा दिला.

दोन भाजप आमदारांचे राजीनामे

नाशिकमधील देवळा चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांनीदेखील राजीनामा दिला आहे. हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. आपल्याला आमदारकीपेक्षा समाज मोठा असल्याचे सांगत दोघांनी मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडे आपले राजीनामे सोपविले आहेत.

राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी 

पाच आमदार मराठा समाजाचे आहेत. तर दत्तात्रय भरणे हे धनगर समाजातील आहेत. रमेश कदम हे मागास प्रवर्गातील आमदार आहेत.  राज्यातील अन्य समाजांप्रमाणे मराठा समाजातील मोठा वर्ग आजही उपेक्षित आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला धरून मराठा आरक्षणास पाठिंबा देत असल्याचे आणि या रास्त मागणीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघाचा राजीनामा देत असल्याचे आ. रमेश कदम यांनी म्हटले आहे.