Fri, Feb 22, 2019 05:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आज कडेकोट बंदोबस्त; सोशल मीडियावर लक्ष

आज कडेकोट बंदोबस्त; सोशल मीडियावर लक्ष

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने बुधवारी मुंबईत होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने राज्यात घडणार्‍या सर्व बारीक हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. आंदोलनामूळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील सहा हजार सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून आंदोलनावर मुंबई पोलीस आयुक्तांसह वरीष्ठ अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. तसेच सोशल मिडियावरुन अफवा पसविणार्‍यांवरही मुंबई पोलिसांची सायबर सेल विशेष लक्ष ठेऊन आहे. 

आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठ्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणसूद्धा लागल्याने संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हीच परिस्थीती बुधवारी देशाच्या आर्थिक राजधानीत होऊ घातलेल्या मराठा आंदोलनावेळी उद्भवू नये. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील प्रत्येक रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या दमतीला पोलीस दलातील रिझर्व फोर्स, राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शिघ्रकृती दल (क्युआरटी), फोर्स वन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) शहरात तैनात राहाणार आहे. अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणार्‍या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. विशेष शाखेकडून आंदोलनावर विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

मंत्रालय, शासकीय मुख्यालये, राजकीय व्यक्ती, नेते, अतीमहत्वाच्या व्यक्ती, तसेच संवेदनशील ठिकाणे, मुख्य प्रवेशद्वारे आणि शहरातील महामार्गांवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. मराठा आंदोलन शांततापूर्णरितीने पार पडावे यासाठी मुंबई पोलीस आयुक्तासंह वरीष्ठ अधिकार्‍यांच्या समन्वयकांशी उच्चस्तवर बैठका सुरु असून सोशल मिडियावरुन अफवा पसरु नये यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने फेसबूक, ट्विटर, वॉटसअ‍ॅप अशा सोशल मिडियाच्या साधनांवर नजर ठेवली आहे.