होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन

मराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:50AM

बुकमार्क करा

पनवेल : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार असून पनवेल येथे झालेल्या मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या बैठकीत 10 फेब्रुवारीपर्यंत आरक्षण न मिळाल्यास 26 फेब्रुवारीला विधानभवनाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यभरातील 150पेक्षा जास्त पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. ही बैठक के.व्ही. कन्या स्कूल येथे सोमवारी दिवसभर सुरू होती.
आतापर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात उतरणार असल्याचे सोमवारच्या बैठकीतून स्पष्ट झाले. येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, 26 फेब्रुवारीला मराठा समाज रस्त्यावर उतरून विधानभवनाला घेराव घालेल, असा इशारा देण्यात आला. आरक्षणासाठी झालेले पहिले आंदोलन हे शांततेत झाले, यानंतरचे आंदोलन मात्र वेगळे असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी जिल्हा आणि तालुक्यात शांततेने आंदोलन काढून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले होते. मात्र, त्यानंतर शेवटचे आंदोलन मुंबईमध्ये मोर्चा काढून झाले. मात्र, मराठा समाजाला आश्‍वासनापलीकडे काही मिळाले नाही. आता मागण्या मान्य करा, नाहीतर उग्र आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई येथील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केवळ आश्‍वासन देण्याचे काम केले. मात्र, त्याची पूर्तता केली नाही. यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याची आवश्यकता आहे, असा सूर सोमवारी पनवेल येथील के. व्ही. कन्या स्कूल येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत सुरुवातीपासूनच पदाधिकार्‍यांनी लावून धरला.

यावेळी मागील आंदोलनावर चर्चा करण्यात आली, तसेच कोपर्डी येथील घडलेल्या कृत्याबाबत आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली याबद्दल प्रथम उपस्थितांनी समाधानही व्यक्‍त केले. त्यानंतर मराठा समाजाने ज्या मागण्यांसाठी आंदोलने केली, त्या मागण्यांवर पुन्हा चर्चा करण्यात आली.