Thu, Jun 27, 2019 18:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आणि पटेलांना ओबीसीमध्ये आरक्षण नको

मराठा आणि पटेलांना ओबीसीमध्ये आरक्षण नको

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:59AM

बुकमार्क करा
ठाणे : खास प्रतिनिधी

मराठा-जाट आणि पटेलांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, जर ओबीसी आरक्षणामध्ये या तीन समाजाचा समावेश केल्यास सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, देशात ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी 27 ते 28 जानेवारी दरम्यान शिर्डी येथे ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेला देशभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

इंग्रज राजवटीमध्ये 1931 ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर योग्य अशी जनगणना झालेली नसल्यामुळे संख्येनुसार ओबीसींना आरक्षण मिळत नाही. आता केंद्र सरकारने ओबीसींचे विभाजन करुन न्या. रोहिणी आयोग नियुक्त केला आहे. मात्र, ओबीसींची संख्या माहिती नसतानाही त्यांचे विभाजन करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी साईसेवा सदन शिर्डी येथे  विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी, अतिमागास आदी जातीप्रवर्गाची देशव्यापी ओबीसी परिषद  हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे. 

मराठा-जाट, पाटीदारांसाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणातही राज्या-राज्यामध्ये काटछाट करण्यात आली असून यापुढे सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी राठोड यांनी केली. यावेळी  प्रकाश मोर्य, लोटनराम निषाद, चंद्रशेखर कुमार, माचनवार, राजबीसरिंह यादव, सविता हजारे, विलास काळे आदी नेते उपस्थित होते.