Mon, Sep 24, 2018 19:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अन्यथा एक ऑगस्टपासून जेलभरो

अन्यथा एक ऑगस्टपासून जेलभरो

Published On: Jul 29 2018 1:40AM | Last Updated: Jul 29 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. कळंबोली येथे बेछूट लाठीचार्ज तसेच गोळीबार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, नाही तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एक ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरकारी पातळीवर मराठा आरक्षणाबाबत वेगवान घडामोडी घडत असताना दुसरीकडे 25 जुलैच्या बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकार थांबवून गुन्हेे मागे घेण्यात आले नाहीत, तर जेलभरोच्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछूट लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या घटनेची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकार्‍यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंददरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा. चर्चेच्या निमित्ताने आंदोलकांत फूट पाडण्याऐवजी मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात यावा, मुख्यमंत्र्यांना सर्व मागण्या माहीत असल्याने सकल मराठा समाज, मोर्चाच्या समन्वयकांनी चर्चेला जायचे नाही, असे ठराव बैठकीत करण्यात आले.