Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यभरात जेलभरो!

राज्यभरात जेलभरो!

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:17AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम असून, बुधवारी राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटले. मुंबईसह विविध भागांत मराठा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. सोलापूरमध्ये आंदोलकांनी पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरला. तर पुण्यात चाकणनंतर जुन्‍नर आणि शिरूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेले आंदोलन सुरूच आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी जेलभरो आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार दुपारी आझाद मैदानात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. 26 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सरसकट गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान देणार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी, कळंबोलीत महिलांवर बेछूट लाठीमार करणार्‍या आणि गोळीबार करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करावी व त्यांना निलंबित करण्याचीही मागणी करण्यात आली. राज्याच्या अन्य भागातही जेलभरो आणि चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलन सुरू असून, सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडीजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प झाला होता. पुणे जिल्ह्यातील जुन्‍नर तालुक्यात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

बेल्हा येथे दोन तरुण विजेच्या टॉवरवर चढले. जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांना खाली उतरविण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाची दमछाक झाली. ठिय्या आंदोलनासाठी जाणार्‍या मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांना रोखल्याने संतप्‍त आंदोलकांनी बॅरिकेटस पाडून थेट पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत झटापटही झाली. पालकमंत्री पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असून, त्यांनी कधी मराठा आरक्षणावर गंभीरपणे चर्चा केली नाही. आरक्षण हाच पर्याय असून, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही आंदोलकांनी यावेळी ठणकावले.