Tue, Jul 16, 2019 00:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन

१ डिसेंबरपासून गनिमी कावा आंदोलन

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने येत्या नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सरकारने जर याबाबतचा शब्द पाळला नाही, तर येत्या 1 डिसेंबरपासून राज्यभर गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, अशी घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चा परळीचे समन्वयक आबासाहेब पाटील व रमेश केरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने ठोक मोर्चाच्या आंदोलनानंतर ज्या मागण्या मान्य केल्या, त्याचा पाठपुरावा दोन महिन्यांत केला जाईल व पुढील आंदोलनासाठी राज्यभर दौरे केले जातील, असे ते म्हणाले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यासाठी व पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी क्रांती ठोक मोर्चाच्या राज्यभरातील प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलावण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. 

मराठा समाजाच्या वतीने राज्यभर 58 मोर्चे काढल्यानंतरही त्याची सरकारने दखल न घेतल्याने ठोक मोर्चाने 18 जुलैपासून आंदोलन सुरू केले. त्यामुळेच सरकारला जाग आली. मराठा समाजाच्या इतर मागण्या मान्य कराव्या लागल्या व त्याचे लेखी आदेश काढावे लागले. मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची जी उपसमिती नेमण्यात आली आहे, त्या समितीने समाजासाठी काहीही केले नसल्याचा     आरोपही पाटील व केरे यांनी केला.