Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचे राजीनामा अस्त्र

काँग्रेसचे राजीनामा अस्त्र

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी काँग्रेसने आमदारांचे सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडलेल्या याबाबतच्या प्रस्तावाला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. मात्र, याबाबतचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात 58 मूक मोर्चे काढण्यात आले, त्यानंतरही प्रश्‍न सुटला नसल्याने हे आंदोलन तीव्र झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत विधानभवनात पार पडली. विरोधी पक्षनेते विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गटनेते शरद रणपिसे, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह विधानसभा-विधान परिषदेचे बहुसंख्य आमदार बैठकीस उपस्थित होते.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सातत्याने चालढकल करत असल्याकडे लक्ष वेधत आरक्षणप्रश्‍नी आमदारांचे सामूहिक राजीनामे देण्याचा प्रस्ताव मांडला. आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विखे-पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावास पाठिंबा दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने जनतेच्या संयमाची परीक्षा न पाहता आणि इतर प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजासह इतर आरक्षणासंदर्भातील निर्णय तातडीने जाहीर करण्याची मागणी करत सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी सामूहिक राजीनामे देण्याची परवानगी देण्याची मागणी बैठकीत केली.

मराठा, मुस्लिम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाचा वणवा पेटला असताना, ठोस निर्णय किंवा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात यावा, यासाठी सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून जे करणे आवश्यक आहे, ते करण्यात येईल. आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याचा विषय दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येईल. यासंदर्भातील पक्षाचे वरिष्ठच निर्णय घेतील, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांना साकडे

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने  आमदारांच्या बैठका घेत मराठा आरक्षणासाठी सोमवारी राज्यपालांना साकडे घातले. राज्यात मराठा आंदोलन पेटले असताना राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.