होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण : आंदोलनाचे लोण पसरले

मराठा आरक्षण : आंदोलनाचे लोण पसरले

Published On: Jul 23 2018 1:22AM | Last Updated: Jul 23 2018 1:16AMमुंबई / सोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण मागणीवरून सुरू असलेले आंदोलन रविवारी अनेक शहरांत पसरले. पंढरपूरकडे जाणार्‍या अनेक बसेसवर दगडफेक करण्यात आली. काही ठिकाणी रास्ता रोकोही झाला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाण्यापासून रोखण्याचा इशारा दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौरा रद्द केला. आता ‘वर्षा’ निवासस्थानी पूजा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद रविवारी राज्यातील अनेक शहरांत उमटले. पुणे, मुंबई आणि सोलापूरसह राज्यभरात मराठा तरुणांनी मोर्चा, ठिय्या आंदोलन करत सरकारबद्दलचा राग व्यक्त केला. आंदोलकांनी राज्यभरातून पंढरपुरात येणार्‍या एकूण 16 बसेसची तोडफोड केली. यामुळे पंढरपुरातील बंदोबस्त आणखी कडककरण्यात आला आहे.  

आतापर्यंत मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे लोण राज्यात इतरत्र पसरू लागले आहे. मुंबईत मराठा समाजातील सुमारे दोनशे तरुणांनी दादरच्या भारतमाता सिनेमाजवळील फुटपाथवर ठिय्या आंदोलन केले. ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या घालून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक ठिय्या आंदोलनात सामील झाले होते. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. मुंबईपाठोपाठ पुण्यातही आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी बस फोडून सरकारचा निषेध नोंदवला.  

मराठा समाजाला आरक्षणाच्या  मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सोलापूर जिल्ह्यात एस.टी.ला बसला. आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी एकट्या सोलापूर विभागातील 52 एस. टी. बसेस फोडल्या. एक बस जाळली. तीन दिवसांच्या आंदोलनात एस.टी. महामंडळाचे जवळपास 22 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सोलापूर आगाराच्या सूत्रांनी दिली.

रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास मुख्यमंत्र्यांना विरोध करण्यात आला आहे. गतवेळी शांततेच्या मार्गाने झालेल्या मराठा आंदोलनास यंदा मात्र हिंसक वळण लागले आहे. यापूर्वी मराठा समाजाने राज्यात शांततेत 58 मूक मोर्चे काढले होते. मूक मोर्चांनी मागणी मान्य होत नसल्याचे सांगत मराठा समाजाने ठोक मोर्चे काढण्याचा इशारा सरकारला दिला होता. ऐन आषाढीच्या पंढरपूर यात्रेदरम्यानच मराठा समाज आक्रमक झाला.

राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली. सोलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. आषाढी वारीनिमित्त सोलापूर विभागातून सोलापूर-पंढरपूर जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. तर राज्याच्या विविध भागातून दर्शनासाठी पंढरपूरला येणार्‍या एस.टी. बसेसची संख्यादेखील मोठी आहे. आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर तर परिणाम झालाच; पण अनेक बसेसचे नुकसानही झाले. शनिवारी सोलापूर-बार्शी महामार्गावर आंदोलकांनी बसला पेटवून दिल्यामुळे सोलापूर-बार्शी महामार्गावर बसेस सोडल्या नाहीत. सोलापूर ते पंढरपूर तिर्‍हे-मंगळवेढामार्गे जाणार्‍या बसेस पूर्णपणे बंद  होत्या. उस्मानाबाद आगारातून बार्शीकडे जाणार्‍या बसेसदेखील रद्द करण्यात आल्या.सोलापूर विभागात बार्शी, पंढरपूर, वैराग, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, सोलापूर बसस्थानक भागात 52 बसेस फोडल्या आहेत.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बसवर दगडफेक

हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे पंढरपूर-हदगाव बसवर अज्ञातांनी दगडफेक करून बसचे नुकसान केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. यामध्ये दहा हजारांचे नुकसान झाल्याचे चालकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच परळीतील ठोक मोर्चा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी गोरेगाव बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन पोलिस प्रशासनाला मराठा समाजबांधवांच्या वतीने देण्यात आले.

शिष्टमंडळाने परळीत यावे : पाटील

बीड : मराठा आरक्षणासाठी पाच दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा करण्यासाठी परळीत यावे, अशी भूमिका आबासाहेब पाटील यांनी मांडली.

औरंगाबादेत परिवहन मंत्र्यांचा निषेध

औरंगाबाद : परिवहन महामंडळाच्या बसची तोडफोड झाल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असे वक्तव्य करणार्‍या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा आंदोलकांतर्फे निषेध करण्यात आला.