Wed, May 22, 2019 15:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणः आज मुंबईत जोर बैठका!

मराठा आरक्षणः आज मुंबईत जोर बैठका!

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बाजूला प्रयत्न चालविले आहेत, तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसह विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा आरक्षणासंदर्भात आपापल्या पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठकांचे आयोजन सोमवारी मुंबईत केले आहे. शिवसेनेची बैठक मातोश्री येथे होणार असून काँग्रेसची बैठक विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या तर राष्ट्रवादीची बैठक धनंजय मुंडे यांच्या निवास्थानी होणार आहे. 

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मातोश्री निवास्थानी सोमवारी दुपारी 12 वाजता बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो लवकरात लवकर यावा, यासाठी सरकारकडून पुरेसा पाठपुरावा व उपाययोजना झालेली नाही. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करण्यास विरोधी पक्ष तयार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली असून यामध्ये राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणार्‍या दिरंगाईसाठी जी कारणे पुढे केली जात आहेत ती योग्य नाहीत. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही आमदारांनी राजीनामे देण्यासही सुरुवात केली आहे. एकंदर राज्यातील परिस्थिती पाहता मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवास्थानी आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.