Tue, Mar 26, 2019 20:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण : आंदोलकांची दिशाभूल नको, तर गुन्हे मागे घ्या

मराठा आरक्षण : आंदोलकांची दिशाभूल नको, तर गुन्हे मागे घ्या

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश सरकारी पातळीवरून देण्यात आलेले नाहीत. आंदोलकांना शांत करण्यासाठी केवळ आश्‍वासने देऊन दिशाभूल करू नका, तर गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरू करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मराठा आरक्षणाच्या निर्णयाची कालमर्यादा जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी परळी येथे नुकतेच ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. याला पाठिंबा देण्यासाठी नऊ ऑगस्टला करण्यात आलेल्या जनआंदोलनात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज्यात काही ठिकाणी उद्रेक निर्माण होऊन हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यांचा आंदोलनादरम्यान घडलेल्या गंभीर गुन्ह्यांत सहभाग नाही, ते गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यास महिना होत आला तरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. याची गंभीर दखल घेऊन तत्काळ गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.