Sat, Mar 23, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील 49 आंदोलकांना जामीन

ठाण्यातील 49 आंदोलकांना जामीन

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:29AMठाणे : दिलीप शिंदे

ठाण्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे 25 जुलै रोजी झालेल्या जिल्हा बंद आंदोलनात अटक केलेल्या 49 आंदोलनकर्त्यांची शनिवारी जामिनावर सुटका झाली. दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे पोलिसांनी मराठा समजातील प्रतिष्ठित व्यक्ती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्या बैठका घेऊन संवाद साधण्यावर भर दिली आहे. संवादाच्या माध्यमातून मराठा समाजातील खदखद दूर करून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आता पोलीस यंत्रणेकडून केले जात आहेत. 

महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये वाहनांची जाळपोळ, दगडफेकीचे प्रमाण वाढले असून सर्वसामान्यांसह सरकार चिंतेत पडले आहे. मराठा तरुणांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. राजकीय नेत्यांना कुणी जुमानत नसल्याने पोलिसांनी बैठकांची मात्रा लागू करीत शांततेचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस- कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून पोलिसांकडून शहरात शांतता, सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. 

त्यांच्यामार्फत मराठा तरुणांना शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यामार्फत त्या त्या परिसरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित, मोर्चाचे समन्वयक, प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.