Fri, Jul 19, 2019 22:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात चक्‍काजाम, रेल रोको

ठाण्यात चक्‍काजाम, रेल रोको

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 1:01AMठाणे : खास प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी ठाण्यात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये बुधवारी काही काळ रेल्वे रोको, महामार्गावर चक्काजाम करण्यात आला. मात्र त्यानंतर शांततामय बंदची समन्वयकांनी सांगता केल्यानंतरही  मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावर दोन ठिकाणी जमावाने रास्तारोको करीत पोलिसांवर दगडफेक केली. चार पोलीस अधिकार्‍यांसह सहा जण जखमी झाले तर पोलिसांच्या दोन गाड्या आणि टीएमटीच्या आठ बसेस फोडण्यात आल्या. आंदोलनामध्ये समाजकंटक घुसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अखेर लाठीजार्च करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून दंगेखोरांना पांगविले आणि 20 जणांना अटक केली.
आंदोलनाला तीन हात नाका चौकात सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावर चक्काजाम करण्यात आला. यावेळी वागळे  इस्टेट आणि वर्तकनगर परिसरात ठाणे परिवहनच्या बसेसवर दगडफेक करून 4 बसेसची तोडफोड करण्यात आली.  नितीन कंपनीजवळही एक बस फोडत माजिवडा उड्डाणपुलावर  टायर जाळले. 

पुढे हे आंदोलनकर्ते रेल्वेस्थानकात घुसले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 5 वर रेल रोको केला. दहा ते पंधरा मिनिटे तीन लोकल थांबविल्यानंतर पोलीस व समन्वयकांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून स्टेशनबाहेर काढले आणि रेल्वे वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. एसटी स्टँण्ड, जांभळी  नाका, मुख्य बाजारपेठ, चरई, आंबेडकर रोड, गोखले रोड, परिसरात काही जणांनी उघडलेली दुकाने  बंद करण्यात आली. यावेळी चिंतामणी चौकातील मुख्यमंत्र्यांंचे बॅनर कार्यकर्त्यांनी फाडले. त्यावेळी नितीन कंपनी परिसरात असलेल्या मर्क्युरी हॉटेलची तोडफोड करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी कापुरबावडीपर्यंत लाँगमार्च केला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. आंदोलनात काही अनोळखे चेहरे दिसू लागल्यानंतर समन्वयकांनी ही बाब पोलिसांच्या निदेर्शनात आणून दिली आणि कापुरबावडी येथे ठाणे बंदची सांगता करून आंदोलनकर्त्यांनी घरी जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलनकर्ते घरी निघून गेले. मात्र दुपारी बारा वाजल्यानंतर नितीन कंपनी, तीन हात नाका येथे काही  आंदोलनकर्त्यांनी पुन्हा तीन तास रस्ता जाम केला. त्यांना विनंती करूनही रस्त्यावर उठण्यास तयारी दर्शविली नाही. याबाबत काही समन्वयकांनी हे कार्यकर्ते आमचे नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला आणि रस्ता खुला केला. त्यानंतर उड्डाणपुलाखालून काही समाजकंठकांनी पोलिसांवर, वाहनांवर दगडफेड करण्यास सुरुवात केली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लांबतुरे आणि हवालदार दत्ता जातक हे जखमी झाले आहेत.

कल्याणमध्ये कडकडीत बंद
कल्याण : वार्ताहर

एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी-जय जिजाऊ, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अन्यथा मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा, अशा आसमंत घोषणांनी कल्याणचा शिवाजी चौक परिसर बुधवारी दणाणून गेला. मराठा आरक्षणाची मागणी आणि औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाला जलसमाधी मिळाल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी कल्याणमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या शिवाजी चौकात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झाली. 

तासभरात जमलेल्या हजारो मराठा बाधवांनी रस्तारोको करत मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. यानंतर जमलेल्या मराठा बांधवांनी कल्याण तहसील कार्यालयाकडे कूच करत कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. 

सकाळपासूनच कल्याण बाजारपेठेतील दुकाने व्यापार्‍यानी बंद ठेवली होती. तर काही उघडी असलेली दुकाने मराठा आंदोलकांनी बंद केली. कल्याणसह डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मोहने, आंबिवली, मुरबाड, शहापूर आदी ठिकाणाहून आलेल्या आंदोलकांनी कल्याण-आग्रा रोडवर चक्काजाम केल्याने वाहतूक खोळंबली होती. तत्पूर्वी ओक टॉवरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात तरुण-तरुणी वर्गासह महिला वृद्ध तसेच लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस मोर्चा अडवणार म्हणून प्रवेशद्वारावरच स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी मराठा तरुणींनी आपल्या समाजावर होणार्‍या अन्यायाची वाचा आपल्या कणखर भाषणाने व्यक्त केल्या. 

एका तरुणीने कविता रुपी गाणे गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. हजारो कार्यकत्यांनी टाळ्या वाजवत व घोषणाबाजी करीत तिला उत्स्फूर्तपणे दाद दिली. मराठा आरक्षणाला सरकार चालढकलपणा करीत असल्याच्या निषेधार्थ काही मराठा तरुणांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सरकारचे श्रद्धा घालत, मुंडन करीत निषेध नोंदवला. कल्याणमधील सकल मराठा समाज-मराठा क्रांती जन आंदोलनच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चातील शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसदर्भातील निवेदन तहसीलदार अमित सानप यांच्याकडे सुपूर्द केले.

मराठा कार्यकर्ता आणि प्रत्यक्षदर्शी जखमी 

नितीन कंपनी परिसरात दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये प्रशांत पवार नावाचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याचवेळी या कार्यकर्त्याला फिट देखील आली. त्याला पोलिसांच्या गाडीमधूनच सिव्हिल हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले. या कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दुसरीकडे याच परिसरात संतोष सांगळे हे केवळ त्या ठिकाणी उभे असताना पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. त्यांना पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंसा करणारे कोण ? 

 सकाळी 11 पर्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला 12 नंतर नितीन कंपनीजवळ हिंसक वळण लागले. मात्र हिंसा करणारे कार्यकर्ते हे मराठा समाजाचे नाहीत असा दावा नेत्यांनी केला आहे. आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन यापूर्वीच कार्यकर्त्यांना करण्यात आले होते. तशाप्रकारे पत्रकेदेखील वाटण्यात आली होती. आंदोलन संपल्यानंतर हिंसा झाली असून त्यात आमच्या कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही, त्यांची माहिती पोलिसांनी देण्यात आली होती, अशी माहिती  डॉ. वामन काळे यांनी दिली आहे. 

एसटीच्या 10 % फेर्‍या रद्द

ठाणे शहरात दुपारी बंदला हिंसक वळण लागले तरी एसटी गाड्यांची कोणतीच तोडफोड झाली नसल्याचे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र बंदमुळे ठाणे विभागातून लांब पल्ल्याच्या व जिल्ह्यांतर्गत होणार्‍या वाहतूकीवर 10 टक्के परिणाम झाला. तसेच प्रवाशांची संख्याही रोडावली होती, तरीही रोजच्या नियमित फेर्‍या ठाणे विभागातून सोडण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या गाड्याही नियमित पणे धावल्या, अशी माहिती एसटीच्या ठाणे विभागाचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले.

20 समाजकंटकांना अटक

मराठा आरक्षणासाठी समन्वयकांनी पूर्ण सहकार्य देऊन ठाणे बंद केले होते. त्यांचा हेतू पूर्ण झाल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले आणि आंदोलनकर्त्यांनी घरी जाण्याचे आवाहनही करण्यात आले होते. परंतु आंदोलन संपल्यानंतर काही समाजकंटकांनी रस्तारोको आणि दगडफेक केली असून त्यातील 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य लोकांची ओळख पटली असून त्यांनाही अटक करण्याची कार्यवाही केली जाईल, असे ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले.

सरकारनेच दगड घेण्यास भाग पाडले 
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळेच मराठा मूक मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चामध्ये झाले. सरकारनेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरुन हातात दगड घ्यायला भाग पाडले, असा आरोप मराठा मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी करीत बंद स्थगित केल्याची घोषणा केली. मुंबईत झालेली तोडफोड ही मराठा समाजाने केली नसून आंदोलनात शिरलेल्या समाजकंटकांनी केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

मुंबईतील बंद यशस्वी झाल्याचे सांगत मराठा मोर्चाचे समन्वयक विरेेंद्र पवार यांनी दुपारी तीन वाजता आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. बंदमुळे घरी परतणारे चाकरमान्यांना त्रास नको म्हणून हा बंद वेळीच मागे घेत असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाने अत्यंत शांततेच्या मार्गाने बंद पाळला. मराठा समाजाने आंदोलादरम्यान तोडफोड केली नसून या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी समाजकंटकांनी ही तोडफोड  करण्यात आल्याचेही  विरेेंद्र पवार यांनी सांगितले.  सकल मराठा समाजाने राज्यात अत्यंत शांततेत 58 मोर्चे काढले. मात्र, सरकारने दखल न घेतल्याने मराठा समाज नाराज झाला आणि आता मूक मोर्चा नव्हे तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्मबलिदान करण्यापर्यंत हे आंदोलन पोहोचले. सरकारनेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरवले असून हातात दगड, काठी घेण्यासाठीही आम्हाला भाग पाडले. या ठोक आंदोलनातून आमच्या हातात काही पडले नसले तरी मराठा समाजात निर्माण झालेल्या संतापाची धग समोर आली असे सांगतानाच शांततेत काढलेल्या 58 मोर्चातून आमच्या हाती काही न पडल्याने हे आंदोलन चिघळल्याचेही समन्वयकांनी यावेळी सांगितले.