Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तर मातोश्रीवर हल्लाबोल; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

तर मातोश्रीवर हल्लाबोल; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Published On: Mar 04 2018 2:10AM | Last Updated: Mar 04 2018 12:42AMमुंबई : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार केली जाणे आवश्यक आहे, ही जयंती तिथीनुसार करण्याचा दुराग्रह शिवसेेनेने सोडून द्यावा, याबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या रवींद्र तांगडे यांच्यावर हल्ला करणार्‍या खासदार चंद्रकांत खैरे व त्यांचे पुतणे सचिन खैरे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची पंधरा दिवसात भेट घेण्यात येणार असून सकारात्मक निर्णय झाला नाही तर मातोश्रीवर हल्लाबोल करण्याचा इशारा देण्यात आला. 

पत्रकार परिषदेमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे पाटील, आबासाहेब पाटील, बन्सी डोके यांनी हा इशारा दिला. शिवजयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचावी व त्यांचे विचार जगभर जावेत यासाठी 19 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवजयंती साजरी होणे आवश्यक आहे. मात्र शिवसेनेचे पदाधिकारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट करत आहेत, तो चुकीचा असून त्यामुळे शिवाजी महाराजांना राज्यापुरते सीमित ठेवण्याचा कावा आहेे. दोनवेळा जयंती साजरी करून शिवरायांची अवहेलना होऊ नये, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. 

मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्ये शिवसेनेच्या 5 मंत्र्यांचा समावेश असताना केवळ एकच मंत्री बैठकांना उपस्थित असतात. सर्व मंत्र्यांनी या बैठकीला हजर राहावे. आजपर्यंतच्या बैठकांचा इतिवृत्तांत जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुढील वाटचालीसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल व सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.