Mon, Jun 24, 2019 17:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरूनच प्रवेश’

‘मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरूनच प्रवेश’

Published On: Jun 15 2018 3:50PM | Last Updated: Jun 15 2018 3:49PMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. जी महाविद्याये निम्मे शुल्क भरून प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशारा महसूल मंत्री व मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घोषित केलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. उपसमितीची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये आहे, अशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्याच्या लेखी सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार आहे. जूनपासून सुरू होणार्‍या प्रवेश प्रक्रियेसाठी ही योजना लागू राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कर्जावरील पहिल्या महिन्याची मुद्दल व व्याज सरकार देणार

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणार्‍या मराठा समाजातील उद्योजकांना दहा लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज राज्य सरकार भरणार आहे. पहिल्या महिन्याचे व्याज व मुद्दलही सरकार भरणार आहे. दुसर्‍या महिन्यापासून व्याज लाभार्थ्याच्या खात्यात देण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले