होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएनजी टंचाईने अनेक पंप बंद!

सीएनजी टंचाईने अनेक पंप बंद!

Published On: Aug 18 2019 1:43AM | Last Updated: Aug 18 2019 1:43AM
मुंबई : प्रतिनिधी 

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रक्रिया केंद्रात झालेल्या बिघाडाचा फटका शुक्रवारी मुंबईतील टॅक्सीचालकांना बसला. सीएनजी केंद्रात कमी दाबाने व सीएनजी आणि एलपीजी मिश्रित गॅस येत होता. त्यामुळे एरव्ही 450 रुपयांच्या किमतीत सीएनजी टाकी फुल्ल होणार्‍या  टॅक्सीचालकांना शुक्रवारी तब्बल 760 ते 770 रुपये मोजावे लागले. गॅसटंचाईचे हे संकट रविवारी दुपारपर्यंत दूर होईल, अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी ‘पुढारी’ला दिली. 

महानगर गॅस लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकार्‍याने पुढारीला सांगितले की, उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रक्रिया केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने एक तर गॅस अत्यंत कमी प्रमाणात येत आहे आणि त्यात तेलही मिसळले जात आहे. यामुळे वडाळ्यातील सिटी गेट स्टेशनला होणारा पुरवठा विस्कळीत झाला. याच स्टेशनमधून संपूर्ण मुंबई मेट्रोपोलिटन  रिजनमधील पंपांना सीएनजी पुरवला जातो. 

या गॅसटंचाईत घरगुती गॅसचा पुरवठा महानगर गॅसने सुरळीत ठेवला असला तरी शुक्रवारी संध्याकाळपासून सीएनजी पंप एकेक करून बंद होत गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गॅसटंचाई रविवारी दुपारपर्यंत कायम राहील. 

सीएनजी पंप चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष एम व्यंकटराव म्हणाले की, उरण येथील समस्येमुळे मुंबईतील 134 सीएनजी केंद्रांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. कमी दाबाने आणि मिश्रित गॅस येत असल्याचे खरे आहे. मात्र कोणतेही सीएनजी केंद्र गॅस पुरवठा होत नसल्याच्या कारणास्तव बंद नाही. मिश्रित गॅस आणि कमी दाबाची समस्या लवकरच सोडवण्यात येईल असे सीएनजी पुरवठादारांना आश्वासित केले आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत सर्व समस्या दूर होतील अशी खात्री आहे. टॅक्सीचालक गणेश शेटे यांनी सांगितले की, दोन दिवसांपासून सीएनजी व एलपीजी मिश्रित गॅस येत असल्याने टॅक्सीचा धंदा बंद ठेवावा लागला. 14 किलो सीएनजीची क्षमता असलेल्या टॅक्सीतील टाकीमध्ये एरव्ही सीएनजी केंद्रात चांगला दाब प्राप्त झाल्यास 450 ते 470 रुपयांत 12 किलो गॅस भरून मिळतो. मात्र काल पासून कमी दाबामुळे व दोन गॅस मिश्रित होऊन येत असल्याने तब्बल 700 रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रचंड नुकसान सहन करण्यापेक्षा धंदा बंद ठेवणेच पसंत केले. सोमवारपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल, असे सीएनजी केंद्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे रविवारीही धंदा बंद ठेवण्याचा विचार केला आहे.

टॅक्सीचालक रमेश रोडे यांनी सांगितले की, याआधी एक टाकी फूल सीएनजी गॅस भरल्यावर शहर परिसरामध्ये 160 किलोमीटरपर्यंत प्रवासी वाहतूक करता येत होती. मात्र कमी दाबाने मिश्रित गॅस भरल्यामुळे सरासरी 90 किलोमीटरचे अ‍ॅवरेज मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक केल्यास तोटा सहन करावा लागेल. मात्र हातावर पोट असल्याने आज सायंकाळी टाकी फूल न करता थोडा गॅस भरून धंदा करणार आहे. उद्यापर्यंत परिस्थिती ठीक झाली, तर टाकी फूल करणार आहे.

मुंबई गॅसवर!
 उरणच्या प्रक्रिया केंद्रात बिघाड झाल्याने ओएनजीसीकडून गॅसपुरवठा न झाल्याने महानगर गॅस लिमिटेडलाही महामुंबई प्रदेशात (एमएमआर) सीएनजी वितरण करता आलेले नाही. 

 शुक्रवारपासून मुंबईतील अनेक सीएनजी पंप बंद पडले आणि शनिवारीही ते सुरू होऊ शकले नाहीत.

 सीएनजीवर धावणार्‍या बेस्ट, राज्य परिवहन, स्कूल बसेस, ऑटो रिक्षा, टॅक्सीज तसेच अ‍ॅपवर चालणार्‍या टॅक्सीज शनिवारी बंद राहिल्या.