साहेब, जागा बदलून मारा!

Last Updated: Mar 30 2020 1:02AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

साहेब मारा, पण जागा बदलून...अशी आर्त विनवणी काही मूळव्याधग्रस्त टवाळखोरांनी पोलिसांकडे केली आहे. संचारबंदीच्या काळात टवाळखोरी करत फिरणार्‍यांना पोलिसांच्या दंडुकेशाहीचा चांगलाच प्रसाद मिळाल्याने त्रस्त झालेल्यांनी ही विनंती थेट वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना केली आहे. या आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र सध्या सर्वांच्याच मनोरंजनाचा विषय ठरला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सध्या पोलिसांची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. कुठे गरिबांसाठी भोजन व्यवस्था सुरू आहे. तर कुठे जिंदगी मौत ना बन जाये, संभालो यारो असे गाणे गाऊन लोकांना स्वत:ची काळजी घेण्याचे भावनिक आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात काही टवाळखोर बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना आवर घालणेही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. अशा बेफिकीर लोकांच्या पार्श्वभागावर पोलिसांकडून दंडुक्याचा जोरदार प्रसाद दिला जात आहे. तर काहींना चक्क ऊठाबशा आणि कोंबडा अशी शिक्षा केली जात आहे.

पोलिसांच्या या दंडुकेशाहीने यातील अनेकजण चांगलेच त्रस्त झाले आहेत. पाठ आणि पार्श्वभाग लालेलाल झालेल्यांना उठणे-बसणेही मुश्कील झाले आहे. अकोल्यामधील अशाच एका महाभागाने चक्क पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून जागा बदलून मारण्याची विनंती केली आहे. नियम मोडणार्‍यांना पोलिसांनी जरून मारावे, पण आधी काही नाजूक जागेवर दुखणे आहे का? चाची विचारणा करूनच नंतर रितसर त्याचा सन्मान केला जावा अशी विनंती अर्जदाराने अधीक्षकांना केली आहे. काही लोकांना मूळव्याध व अंडकोशाचा आजार असतो. त्यामुळे पार्श्वभागावर पोलिसाचा दंडुका बसल्यास त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हे दुखणे आयुष्यभर पाठ सोडत नाही. म्हणूनच मारण्यापूर्वी पोलिसांनी खातरजमा करावी आणि नंतरच मारावे, अशी हात जोडून विनंती या अर्जदाराने केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते अनेकांच्या मनोरंजनाचा विषय ठरले असले तरी या पत्रातून मूळव्याधग्रस्तांची कैफियत जनतेसमोर आली आहे.articleId: "185566", img: "Article image URL", tags: "Many of them suffer well because of this police brutality",