Fri, Mar 22, 2019 05:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माणिकरावांचा पत्ता काँग्रेसकडून कट

माणिकरावांचा पत्ता काँग्रेसकडून कट

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता काँग्रेसने कट केला आहे. त्यांच्याऐवजी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गटनेते शरद रणपिसे यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा सदस्यांद्वारे विधानपरिषदेवर पाठविण्यात येणार्‍या 11 सदस्यांची मुदत संपत असून त्यासाठी 16 जुलै रोजी मतदान होत आहे. काँग्रेसचे उपसभापती माणिकराव ठाकरे, गटनेते शरद रणपिसे आणि संजय दत्त हे तीन सदस्य निवृत्त होत आहे. विधानसभेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संख्याबळानुसार आघाडीचे तीन सदस्य या निवडणुकीत निवडून येऊ शकतात. आघाडीतील जागावटपाच्या सूत्रानुसार काँग्रेस दोन जागा या निवडणुकीत लढणार आहे. त्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून ठाकरे, रणपिसे, दत्त यांनी दिल्ली जोरदार फिल्डिंग लावली होती. पण त्यापैकी रणपिसे यांना परत उमेदवारी देण्यावर काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिक्कामोर्तब केले.

उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट करून यवतमाळमधील युवा नेतृत्व डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी घोषित केली. संजय दत्त हे गेले काही दिवस उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकून होते, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही राज्यातील नेत्यांकडून दिल्लीदरबारी जोर लावला होता, प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासाठी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आग्रही होते, पण काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने अनपेक्षितपणे डॉ. मिर्झा यांना उमेदवारी घोषित करून सर्वांनाच धक्का दिला आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीने बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी दिली आहे.