Tue, Jun 18, 2019 22:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी मंदार झाला विजयजी जैन मुनी

मराठी मंदार झाला विजयजी जैन मुनी

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:35AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरातील 19 वर्षीय मंदार म्हात्रे या मराठी तरुणाने शुक्रवारी शेकडो जैन बांधवांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश करून जैन मुनीची दीक्षा स्वीकारली. मंदार आता मुनीलाल मार्ग शेखर विजयजी मुनी या नव्या नावाने ओळखला जाणार आहे.

सोमवंशी क्षत्रीय पाठारे समाजात जन्माला आलेल्या मंदार डोंबिवलीच्या मराठीबहुल लोकवस्तीत आई-वडिलांसोबत राहतो. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील पाटकर विद्यालयात झाले आहे. शेजारी राहणार्‍या मधुबेन यांच्यासोबत मंदार 2014 सालातच जैन साधूंच्या संपर्कात आला. तो लहानपणापासून जैन मंदिरात जात असे. तेव्हापासून त्याच्यावर जैन समाजातील परंपरा, रूढी याचा प्रभाव आहे. त्याने अनेक संस्कार शिबीर दौरे केले. ज्यांना मूल-बाळ नाही अशा मधुबेन यांनी हा मार्ग दाखवल्याचे मंदार यावेळी म्हणाला.

शुक्रवारी सकाळी स. वा. जोशी हायस्कूलच्या प्रांगणात दीक्षान्त विधी पार पडला. या सोहळ्याला जैन साधू-मुनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जैन मुनींनी मंदार याचे मुनीलाल मार्ग शेखर विजयजी मुनी असे नामकरण केले आहे. अन्य धर्मातील तरुणाने जैन धर्म स्वीकारण्याची ही दुर्मीळ घटना आहे. सांस्कृतिक मराठी शहरात एका मराठी तरुणाने जैन धर्म स्वीकारून जैन मुनीची दीक्षा घेतली आहे, यावर सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Mandar Mhatre, Marathi Youth Friday, Entrance to Jainism,