Fri, Nov 16, 2018 09:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थकबाकी मागाल तर सिलिंडर स्फोटाने घर उडवेन!

थकबाकी मागाल तर सिलिंडर स्फोटाने घर उडवेन!

Published On: Feb 24 2018 9:39AM | Last Updated: Feb 24 2018 9:39AMविक्रोळी : प्रतिनिधी

कर्ज भरले नसल्याने करण्यात येणारी घर, दुकानावरील जप्ती रोखण्यासाठी कर्जदाराने घरातील सिलिंडरचा स्फोट करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये समोर आला आहे. येथील दीपक शिवलकर यांनी शिवसह्याद्री पतपेढीतून 2005 साली काढलेले साडेबारा लाखांचे कर्ज थकवल्याने 30 लाखांवर गेले आहे.

कोर्टाचा आदेश घेऊन शुक्रवारी सकाळी पतपेढीचे वसुली अधिकारी घर, दुकानावर जप्ती करण्यास आले असता दीपक यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट करण्याची धमकी देत स्वतःला घरात कोंडून घेतले. त्याने शिवसह्याद्री पतपेढीतून 2005 साली साडेबारा लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने हे कर्ज 30 लाख रुपयांपर्यंत गेले. घरात बळजबरीने घुसलात तर स्फोट करण्याचे सांगत दीपकने सिलिंडर दरवाजात आणला आणि गॅसची तोटी काही काळ मोकळी देखील केली.  घरात स्वतःसह पत्नीला कोंडून घेतले. पोलिसांनी दीपकला समजावून गॅस सिलिंडरपासून दूर होण्यास सांगितले. त्यानंतर पेट्रोलने भरलेली बाटली आणून स्वतःला पेटवून देण्यासह सिलिंडर स्फोटाचीही धमकी दिली. सुरक्षेसाठी पोलिसांनी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बोलावून घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी देखील त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, दीपक ऐकण्यास तयार नव्हता. पाच वाजल्यानंतर अधिकारी निघून गेल्यानंतर येथील रहिवाशांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. दुसरीकडे, या प्रकारामुळे शुक्रवारची कारवाई टळली असली तरी पुन्हा आदेश काढून जप्ती करण्यात येईल, असे बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विशेष कर्जवसुली व विक्री अधिकारी युवराज मुळूक यांनी सांगितले.