Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माळशेज घाट वाहतुकीसाठी खुला, पर्यटकांसाठी बंद

माळशेज घाट वाहतुकीसाठी खुला, पर्यटकांसाठी बंद

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:28AMमुरबाड/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मुसळधार पावसामुळे 20 ऑगस्टच्या पहाटे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग , पोलीस यांनी भर पावसात आणि दाट धुके असूनही दरड, माती दूर करण्यात यश मिळविले असून तब्बल चार दिवसानंतर आज वाहतूक सुरू झाली आहे.

21 आणि 22 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर असल्याने माळशेज घाटातील दरड हटवण्याचे काम हे थांबून थांबून करावे लागत होते. शिवाय दरड दूर केलेली असली तरी डोंगरमाथ्यावरून सतत पाण्याचे प्रवाह, छोटे छोटे दगड रस्त्यावर येतच होते. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. नंतरचे दोन दिवस पाऊस बर्‍यापैकी कमी झाल्याने कामही झपाट्याने पूर्ण करता आले आणि शुक्रवारी रात्री उशिराने वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली, असे ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितले.

पर्यटकांना प्रतिबंधात्मक आदेश

दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देशाप्रमाणे माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी 1 किमी परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश तहसीलदार सचिन चौधर यांनी जारी केले आहेत. हे आदेश 31 ऑगस्टपर्यंत अमलात राहतील. कुठलीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत. खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या ठिकाणी जाणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहने वेगाने चालविणे, या परिसरात मद्यपान करून प्रवेश करणे, मोठमोठ्याने संगीत लावणे, महिलांची छेडछाड असे प्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.