Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुपोषण, बालमृत्यू, स्थलांतर प्रचारात केंद्रस्थानी

कुपोषण, बालमृत्यू, स्थलांतर प्रचारात केंद्रस्थानी

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:23AMवसई : दीपक मोहिते

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार ऐन रणरणत्या उन्हात सुरू आहे. येथे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येत्या 14 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यादिवशी संध्याकाळी या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अनेक अपक्षही रिंगणात आहेत.तसेच राजकीय पक्षांचे काही डमी उमेदवारही रिंगणात आहेत. परंतु, हे उमेदवार माघार घेतील असा अंदाज आहे. ज्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

पालघर जिल्हा आर्थिक, सामाजिक तसेच विकासाच्या दृष्टीने मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अठराविश्‍व दारिद्य्र असून पाणीटंचाई, कुपोषण, बेरोजगारी, विस्कळीत शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था, आदिवासी समाजाचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर, बालमृत्यू, दळणवळणाच्या अपुर्‍या सोई-सुविधा, पाणीटंचाई, जलसिंचनाचे प्रश्न आणि लयाला जात असलेले कृषीक्षेत्र या समस्या येथील ग्रामीण जनतेच्या पाचवीला पूजल्या आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प या जिल्ह्यावर लादण्यात आल्यामुळे सध्या ग्रामीण भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रमुख समस्याच प्रचारात केंद्रस्थानी राहणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी सरकारतर्फे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यात निर्माण झालेला संघर्ष हा सरकारला एकप्रकारे इशाराच होता. डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प गेली अनेक वर्षे खितपत पडला आहे.तो मार्गी लावण्याऐवजी विनाशकारी प्रकल्प लादण्याचा होत असलेल्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. आदिवासी कसत असलेल्या वनजमिनींचे प्लॉट त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत असल्यामुळे आदिवासी समाज नाराज आहे. तसेच अतिग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याच्या शासनाच्या हालचालीमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कुपोषित बालकांना एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे देण्यात येणार्‍या पोषण आहारातील बजबजपुरी ही कुपोषण निर्मूलनप्रश्नी त्रासदायक ठरली आहे. असे असतानाही प्रशासन याबाबत कोणतिही कार्यवाही करत नाही. त्यामुळे या प्रश्‍नांवरच एकमेकांना घेरण्याचा निर्धार सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे.या मतदारसंघातील वसई, नालासोपारा परिसर वगळता पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा व विक्रमगड हे आदिवासीबहुल आहेत. नवा जिल्हा अस्तित्वात येवून 4 वर्षे पूर्ण होत आली,परंतु अपेक्षित विकासकामे होवू शकली नाहीत.