Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर मालाड रेल्वे पादचारी पूल बंद

अखेर मालाड रेल्वे पादचारी पूल बंद

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 1:03AMमालाड : वार्ताहर

मालाड पूर्व राणी सती मार्ग ते मालाड पश्चिम आनंद रोडला जोडणारा रेल्वे पादचारी पूल गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. अखेर रविवारी रेल्वे प्रशासनाने हा पूल धोकादायक ठरवून बंद केला आहे. तशा प्रकारचे सूचना फलक येथे लावण्यात आले आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर या पुलाची रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. पूल मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा असल्याने याबाबत पालिकेला कळवणार असल्याचे त्यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. या पुलाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. मात्र, याकडे पालिका, रेल्वे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले.

सध्या मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा पूल धोकादायक असल्याने येथून प्रवेश बंद केला आहे. 1982 साली पुलाची निर्मिती झाल्यानंतर एकदाही पुलाची डागडुजी झाली नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप प्रवाशांचा आहे.

डिसेंबर 2016 साली स्थानिक नगरसेवक विनोद शेलार यांनी पुलाच्या रेल्वे ट्रॅकवरील भागाचे नूतनीकरण केले. मात्र, पश्चिमेतील रेल्वे फाटक ते जैन मंदिर आनंद रोडवरील दोनशे मीटरचा भाग दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे या  भागाला भगदाड पडले आहे. तसेच पुलाचे प्लास्टरदेखील तुटून पडले आहे. लोखंडी सळ्या दिसत असल्याने हा पूल धोकादायक बनला आहे.