Sat, Aug 17, 2019 16:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉटेलमध्ये कार्ड घासताय? सावधान!

हॉटेलमध्ये कार्ड घासताय? सावधान!

Published On: Aug 15 2018 1:44AM | Last Updated: Aug 15 2018 1:44AMमुलुंड : वार्ताहर

हॉटेलमध्ये वेटरचे काम करून ग्राहकांच्या डेबिट कार्ड, स्किमर मशीन द्वारे कॉपी करून त्याचे नकली कार्ड बनवून बँक खात्यातून पैसे लंपास करणार्‍या टोळीला मुलुंड पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. करन ऊर्फ धनेश सुरेश टंडन (छत्तीसगड), तुकाराम गुडाजी ऊर्फ विजय रेड्डी आणि मारुती बर्मा गुडाजी अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. फिर्यादीकडे एटीएम कार्ड असतानाही कर्नाटकातील धारवाड  येथून त्याच्या खात्यातून चोवीस हजार रुपये काढण्यात आले. या प्रकरणाचा तपास परिमंडळ सात चे पोलीस उपायुक्त अखिलेशकुमार सिंग यांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश वारके  यांच्याकडे दिला होता. प्रकाश वारके यांनी बँकेच्या नोडल अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्याकडून अशा प्रकारचे आणखी तक्रारी आहे का?  याबाबत माहिती मागवली.एचडीएफसी बँकेचे अधिकारी विजेश कुंदर व  प्रसाद यांनी त्यांच्या बँकेचा डाटा चेक करून त्यांच्या बँकेच्या एकूण 64 ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांना सांगितले. सदरच्या सर्व 64 ग्राहकांनी त्यांची फसवणूक होण्यापूर्वी त्यांच्या डेबिटकार्डचा व्यवहार कोठे केला होता? याबाबत माहिती मिळविण्यात आली. बँकेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नमूद ग्राहकांनी मुंबईतील सुनील हॉटेल प्रा. लि., अपना धाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट यापैकी एका हॉटेलमध्ये त्यांच्या डेबिट क्रेडिट कार्डचा वापर केला असल्याचे दिसून आले.

 सदरच्या सर्व हॉटेलमध्ये जावून तपास करण्यात आला असता, धनेश ऊर्फ सुरेश  टंडन नावाच्या इसमाने सदरच्या सर्व हॉटेलमध्ये काही दिवसांकरिता काम केल्याचे आढळून आले. त्याच्याबाबत माहिती मिळविता तो हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी ग्राहकांचे डेबिट अथवा  क्रेडिट कार्ड हाताळत असल्याची माहिती मिळाली. लागलीच करन ऊर्फ धनेश सुरेश टंडन याचा त्याचे रहाते पत्त्यावर तसेच लोकेशन शोध घेतला असता तो त्याच्या मुळगावी सेंद्री, पोस्ट बिजराडीह  भाटापाडा, जिल्हा- बलोदा बाजार, छत्तीसगड येथे असल्याची माहिती मिळून आली. मुलुंड पोलिसांच्या पथकाने लगेच  त्याचे गावी जावून शोध घेत त्याला अटक करण्यात आली.