Fri, Jul 19, 2019 01:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिनाअखेरीस मोठे प्रशासकीय बदल !

महिनाअखेरीस मोठे प्रशासकीय बदल !

Published On: Apr 13 2018 1:34AM | Last Updated: Apr 13 2018 1:32AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य प्रशासनात महिनाअखेरीस मोठे फेरबदल केले जाणार आहेत. 27 एप्रिलला राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन किंवा मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यापैकी एकाची वर्णी लावली जाणार आहे. परंतु, अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ या सर्वात ज्येष्ठ अधिकारी असताना त्यांना डावलले जाणार असल्याने महिला सनदी अधिकार्‍यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस. मदान हे गेली पाच वर्षे त्याच पदावर असून त्यांची बदली केली जाणार असून तेथे वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्य सचिव सुमित मल्लिक हे 27 तारखेलाच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची मुख्य माहिती आयुक्तपदावरील नियुक्तीही निश्‍चित झाली आहे. मात्र, त्यांची जागा कोण घेणार याबाबत प्रशासनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगिळ आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव वरच्या स्थानी आहेत. मात्र, मुख्य सचिवपदासाठी डी. के. जैन आणि अजोय मेहता यांच्या नावाची चर्चा सुरु असून जैन यांचे पारडे जड मानले जात आहे.

डी.के. जैन यांनी दिल्लीत केलेल्या कामाचा राज्याला फायदा होईल तसेच त्यांची प्रशासनातील स्वच्छ व कडक शिस्तीचे अधिकारी अशी प्रतिमा आहे. तर, अजोय मेहता हे एक निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिवाय मुंबई महापालिकेच्या कारभारावर त्यांनी घेतलेले नियंत्रण पहाता सरकारच्या अखेरच्या दिड वर्षात असाच धडाकेबाज अधिकारी हवा, असाही सूर आहे. मात्र, नियुक्तीबाबत अजून अंतिम निर्णय झाला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेतील. सध्या तरी डी. के. जैन यांचे पारडे जड मानले जात आहे.

परंतु, सेवाज्येष्ठतेमध्ये सर्वात वरच्या स्थानी असलेल्या मेधा गाडगिळ या एका महिला अधिकार्‍याला डावलले जात असल्यानेही प्रशासनात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विशेषत: महिला सनदी अधिकार्‍यांमध्ये त्याबाबत चर्चा सुरु आहे. मेधा गाडगिळ या काँग्रेस नेते आमदार अनंत गाडगिळ यांच्या पत्नी आहेत. त्यांचे संपूर्ण घराणे हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जाते. म्हणूनही त्यांची संधी डावलली जात असल्याची चर्चा प्रशासनात आहे. 

युपीएस मदान हे गेली पाच वर्ष एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची बदली केली जाणार आहे. या पदासाठी आर. ए. राजीव यांची नियुक्ती होऊ शकते. तर, मदान यांना मंत्रालयात आणण्यात येणार आहे. डी. के. जैन यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली तर मदान हे वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी येऊ शकतात. याशिवाय विविध विभागाच्या सचिवांमध्येही बदल केले जातील. 

Tags : Mumbai, Major administrative, changes, month end, Mumbai news,