Sun, Feb 17, 2019 07:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेजर प्रसाद महाडिक अनंतात विलीन

मेजर प्रसाद महाडिक अनंतात विलीन

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 12:58AM

बुकमार्क करा
विरार : वार्ताहर

अरूणाचल प्रदेशातील मिलिट्री कँपमधील तंबूला लागलेल्या आगीचा बळी ठरलेल्या मेजर प्रसाद महाडिक यांच्या पार्थिवावर मंगळवारी विरारमध्ये लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  प्रसाद यांच्या पार्थिवाला वडिल गणेश महाडिक यांनी अग्नी दिला. अंत्ययात्रेत हजारो विरारकर नागरिक सामील झाले होते.

मेजर प्रसाद महाडिक यांचा शनिवारी मृत्यू झाला. सोमवारी रात्री गुवाहाटी येथून लष्कराच्या विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईत दाखल झाले. पार्थिव मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास त्यांच्या विरार पश्‍चिमेत बोळींज येथील  विरार पश्चिमेकडील बोळींज यशवंत दीप सोसायटीतील निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांची पत्नी गौरी, आई संजना, बहिण प्राजक्ता यांनी हंबरडा फोडला. वडिल गणेश, काका शिवाजी महाडिक यांनाही दु:ख आवरेनासे झाले. यानंतर पार्थिव सोसायटीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी विरारकर नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी केली. आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष चव्हाण, तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर, नगरसेवक सुदेश चौधरी, महेश पाटील, दिलिप पिंपळे आदींसह सरकारी अधिकार्‍यांनी अंत्यदर्शन घेतले.

अंत्यदर्शनासाठी जमलेल्या नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, मेजर महाडीक अमर रहे आदी घोषणा दिल्या. 12.50 वा. अंत्ययात्रा निघाली. दुपारी 1.39 वा. वडिल गणेश यांनी प्रसाद यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. दरम्यान, कर्नल सी. ई. फर्नांडीस, लष्कर, पोलीस आणि प्रसाद यांच्या पत्नीने त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी हवेत गोळीबार करुन जवानांनी त्यांना सलामी दिली.