Sun, Jun 16, 2019 08:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाणे, पालघरवर महायुतीचा भगवा!

मुंबई, ठाणे, पालघरवर महायुतीचा भगवा!

Published On: May 24 2019 2:37AM | Last Updated: May 24 2019 2:32AM
मुंबई/ठाणे : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मुंबईवर पुन्हा महायुतीचा भगवा फडकला. सलग दुसर्‍यांदा महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे. विशेष म्हणजे सुरूवातीपासून काँग्रेसचा त्याहीपेक्षा मिलिंद देवरा व प्रिया दत्त यांचा बालेकिल्ला राहिलेल्या दक्षिण मुंबई व उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातही विरोधकांना आपले वर्चस्व दाखवता आले नाही. सहा महिन्यांत होेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा समजली जाते.

देशभरात आलेल्या मोदी त्सुनामीमध्ये विक्रमी मताधिक्य घेत ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे यांनी आपली ठाणेदारी, कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुभेदारी आणि भिवंडीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी आपली पाटिलकी कायम राखत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडविला. 

ठाणे, कल्याणमध्ये एकतर्फी लढती झाल्या असून विचारे यांना 4 लाख 5 हजार तर शिंदे यांना तीन लाख 68 हजारांचे विक्रमी मताधिक्य मिळाले. पक्षांतर्गत नाराजी असतानाही पाटील यांनी दीड लाखांचे मताधिक्य मिळविण्याची किमया केली. तर मतदारसंघाबरोबर उमेदवाराची देवाण-घेवाण झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी 88 हजार 883 मतांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे.