Sun, Mar 24, 2019 13:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महावितरणकडून राज्यात विजेचा विक्रमी पुरवठा

महावितरणकडून राज्यात विजेचा विक्रमी पुरवठा

Published On: Apr 18 2018 7:34PM | Last Updated: Apr 18 2018 7:44PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

महावितरणने काल मंगळवार, (17 एप्रिल) ला राज्यात १९ हजार ८१६ मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेची मोठया प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळेच विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले.

राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात १७ एप्रिल २०१८ ला १९ हजार ८१६ मेगावॅट एवढया विजेची कमाल मागणी नोंदविण्यात आली होती. महावितरणने विजेची ही संपूर्ण मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यात वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळेच एवढया मोठया प्रमाणातील विजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. 

सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून ६ हजार ५०० मेगावॅट वीज उपलब्ध होते. तर, केंद्रीय प्रकल्पातून सुमारे ४ हजार ५००, खासगी प्रकल्पातून दीर्घमुदतीच्या कराराद्वारे सुमारे ४ हजार २०० मेगावॅट वीज पुरवठा केला जातो. त्याचबरोबर लघूमुदतीच्या कराराद्वारे सुमारे ६३५ मेगावॅट तर इतर विविध स्त्रोतांकडून सुमारे ३ हजार ९८१ वीज उपलब्ध होत आहे.

१७ एप्रिलला मुंबईची विजेची सर्वोच्च कमाल मागणी ३ हजार ५४२ मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली तर संपूर्ण राज्याची विजेची कमाल मागणी २३ हजार ३५८ एवढी नोंदविण्यात आली.

 

Tags : mumbai, mumbai news, Mahavitran, power supply, record,