Wed, Jan 16, 2019 09:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा-कोरेगाव प्रकरण : मुंबईत तणाव, गाड्यांची तोडफोड

भीमा-कोरेगाव प्रकरण : मुंबईत तणाव, गाड्यांची तोडफोड

Published On: Jan 03 2018 3:09PM | Last Updated: Jan 03 2018 3:14PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा-कोरेगावमध्ये दोन गटात झालेल्‍या दगडफेकीच्या पाश्वर्भूमीवर आज संपूर्ण महाराष्‍ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. आज सकाळपासूनच राज्‍यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीसारखे  प्रकार घडत आहेत. मुंबईतही विविध भागात आंदोलकांनी गाड्या अडविण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्या दिवसभर बदल करण्यात आल्या आहेत. तर, मध्य रेलवेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.  

डोंबिवली, ठाणे, कांजुर, घाटकोपर, विक्रोली, कुर्ला, दादर आदी सर्व स्थानके बंद करण्यात आली आहेत. कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गही बंद करण्यात आला आहे. त्‍यामुळे अनेक वाहनचालक रस्‍त्‍यातच अडकले आहेत. आंदोलक मोठ्या संखेने रस्‍त्‍यावर उतरल्‍याने बेस्ट बस आणि खाजगी वाहतूक सेवांवर परिणाम झाला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केल्‍यामुळे वाहतूक विस्‍कळीत झाली. कलंबोली सर्कल येथे आंदोलकांकडून एस.टी बसवर दगडफेक करण्यात आली. गोवंडी ब्रिज व फ्रीवे दरम्यानही तणावाचे वातावरण आहे. 

आंदोलकांनी मानसरोवर रेल्वेस्थानकात रेल्‍वे रोको केल्‍यामुळे मुंबई तसेच पनवेलकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही गाड्या रेल्वेस्थानकात अडकून असल्‍याने प्रवाशांचे हाल होत आहे.  चेंबूरच्या घाटात आचार्य मार्गावर उभ्या असलेल्या २५ ते ३० गाड्यांची तोडफोड झाल्‍याने त्‍याठिकाणी तणावाचे वातावरण आहे.  

आंदोलकांनी ठाणे महापालिका बंद करण्याची मागणी केली. कळव्यातील खारेगावात आंदोलन कर्त्यांची मोटरसायकल स्थानिक गाववाल्यांनी फोडली आणि आंदोलन कर्त्यांना मारहाण केली. दुपारी सुरू झालेल्या द्रुतगती महामार्ग बंदमुळे दहिसर ते पार अंधेरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. ठाणे,विरार, दहिसर मार्गाहून मुंबई येणाऱ्या वाहनांना तर वांद्रे, अंधेरी, बोरिवली येथून बाहेरगावी जाण्याऱ्या प्रवाशांना महामार्गावरच अडकून बसावे लागले. यामध्ये बाहेगावाहून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्स, बेस्ट बस, भाजी पाल्यांच्या गाड्यासह खाजखी चारचाकी वाहनचालकांचा समावेश होता.