Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द

जिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द

Published On: Jan 03 2018 12:14PM | Last Updated: Jan 03 2018 12:14PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांची आज मुंबईत होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव येथील दगडफेकीच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्‍ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. राज्‍यात अनेक ठिकाणी आज सकाळपासून एसटी बस आणि खासगी वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. काही ठिकाणी टायर जाळून, रास्‍ता रोखो करून भीमा-कोरेगाव घटनेचा निषेध व्यक्‍त केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. त्‍यामुळे तणावाची परिस्थिती लक्षात घेता मेवानी यांची सभा रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी सायंकाळी सहा वातजा वरळी येथे मेवानी यांची सभा होणार होती. मात्र, पुण्यातील त्‍यांचे भाषण आणि सद्याची राज्‍यातील वातावरण लक्षात घेता त्‍यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. ठाण्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील मेट्रो सेवा बंद केली आहे. अशा परिस्थितीत मेवानी यांची मुंबईत आज सभा झाली तर, परिस्थिती आणखी चिघळू शकते. कायदा आणि सुव्यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्‍यामुळे मेवानी यांची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्‍यान, पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या (दि. 31) एल्गार परिषदेत मेवानी यांनी भावना भडकावणारे वक्तव्य केल्याने राज्यात दोन समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार मंगळवारी (दि. 2) डेक्कन पोलिसांकडे करण्यात आली आहे. अक्षय गौतमराव बिक्कड (22) आणि आनंद गणेशराव धोंड (25) यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.