Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल

रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:40AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती संघटित क्षेत्रात झाली आहे. या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. राज्यात या सात महिन्यात  8 लाख 17 हजार 302 इतकी रोजगार निर्मिती झाली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) या सात महिन्यातील आकडेवारी 21 मे रोजी जाहीर केली असून त्यात 6 आघाडीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या राज्यांची एकत्रित बेरीज ही एकट्या महाराष्ट्रातील रोजगारनिर्मितीच्या संख्येएवढी आहे. ही आकडेवारी संघटित क्षेत्रापुरतीच आहे. ज्या आस्थापनांनी ईपीएफओकडे खाते उघडले तीच संख्या यामध्ये अंतर्भूत आहे. 

कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 8 लाख 17 हजार 302 रोजगार निर्माण झाले असून दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूमध्ये 4 लाख 65 हजार 319 रोजगार तर तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या गुजरातमध्ये 3 लाख 92 हजार 954 रोजगार निर्माण झाले आहेत. हरयाणात 3 लाख 25 हजार 379 इतके रोजगार निर्माण झाले आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात 2 लाख 93 हजार 779 रोजगारनिर्मिती झाली आहे. दिल्ली सहाव्या क्रमांकावर असून तेथे 2 लाख 76 हजार 877 रोजगार निर्माण झाले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्योगस्नेही धोरणांची तसेच कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी आखलेल्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र आदी उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या करारांनी मूर्त रुप घेतले आहे. त्यातूनही रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यादेखील महाराष्ट्र आघाडीवर आहे.