Thu, Jul 09, 2020 07:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा

रस्ते अपघातांच्या बळींमध्ये महाराष्ट्र दुसरा

Last Updated: Nov 18 2019 2:00AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये महाराष्ट्राची स्थिती अत्यंत वाईट असून देशामध्ये होणार्‍या रस्ते अपघातांच्या संख्येत राज्य दुसर्‍या क्रमांकावर आले आहे. 2018 मध्ये या प्रकारच्या अपघातांत 13,226 जणांनी प्राण गमावले. 2017 च्या तुलनेत हा आकडा 8.1 टक्क्यांनी वाढला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनल्याचे चित्र पुढे आले आहे. 

यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ वाहतूक अधिकार्‍याने सांगितले की, बेदरकारपणे आणि अतिवेगाने वाहन चालवणे या दोन कारणांमुळे महाराष्ट्रात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बळी पडणार्‍यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी या बळींची संख्या 5,938 इतकी होती तर संपूर्ण देशात एकूण रस्ते अपघातांत बळी पडलेल्यांमध्ये 60 टक्के अपघात दुचाकीस्वारांचे होते. 

गेल्या वर्षी राज्यामध्ये किमान 25 अपघात असे होते की त्यातील प्रत्येक घटनेत पाचहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. जुलै 2018 मध्ये दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना घेऊन सहलीला जाणारी बस पोलादपूरच्या आंबेनळी घाटत कोसळून 33 जण ठार झाले होते. हा गेल्या वर्षीचा सर्वात मोठा रस्ते अपघात होता. यात एकमेव व्यक्ती वाचली होती. तर दुसर्‍या मोठ्या घटनेत दोन आराम बस एकमेकावर आदळून झालेल्या अपघातात बुलढाणा येथील 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनांनंतर वाहनांच्या वेगावर नियंत्रण राखण्यासाठी  वाहतूक विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली.

त्यानुसार द्रुतगती मार्गावर ताशी 100 कि.मी., तर डोंगराळ आणि घाटात ताशी 50 कि.मी. ने वाहन चालवण्याची अट घालण्यात आली होती. तर राष्ट्रीय महामार्गावर ताशी 90 कि.मी. तर शहरी भागातील रस्त्यांवर ताशी 60 कि.मी.वेगाने वाहन चालवण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते.

वेगमर्यादा कमी केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अतिवेगाने वाहन चालवणार्‍यांविरोधात मोहीम सुरू केली. त्यात सिग्नल तोडणे, दारू पिऊन गाडी चालवणे तसेच गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे आदी कारणांसाठी वाहनपरवाना निलंबित करण्यात येऊ लागला. यामध्ये ओव्हरटेक करणार्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. अवजड वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला जात असताना लहान वाहने डाव्या बाजूने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. हे प्रमाणदेखील वाढले आहे.

महामार्ग पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, महामार्गावर ज्याठिकाणी एकापेक्षा अधिक रस्ते एकत्र येतात तेथे अपघात होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच जेथे रस्ता दुभाजक नाही त्याठिकाणीही अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या रस्त्यांवरील अपघातांत 35,717 अपघात झाले. त्यात 3,129 जणांना बळी गेला. यात 25 ते 35 वयोगटातील तरुणांचा अधिक समावेश होता. सायंकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान सर्वाधिक गंभीर घटना घडल्या. त्यात पादचार्‍यांचे 6,112 मृत्यू झाले.