Mon, Sep 24, 2018 20:49



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात माता मृत्युदर झाला कमी

महाराष्ट्रात माता मृत्युदर झाला कमी

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 2:16AM



मुंबई : प्रतिनिधी

माता मृत्यूदर 68 वरुन 61 पर्यंत कमी करण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरला असून देशभरात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ देशात प्रथम असून त्यानंतर महाराष्ट्र आणि तिसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू राज्य आहे. 

माता मृत्यूदर कमी करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या कामगिरीची दखल घेत दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान पुरस्कार आरोग्य विभागाचे सचिव प्रदिप व्यास यांनी स्वीकारला.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या अभियानांतर्गत असलेल्या संकेतस्थळावर खासगी तसेच सरकारी डॉक्टर यांची नावे नोंदवावी लागतात. या संकेतस्थळावर देशभरातील जवळपास पाच हजार डॉक्टरांनी नावे नोंदविली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक 600 डॉक्टरांचा समावेश आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला मातृत्व अभियानांतर्गत डॉक्टर आपल्या सेवा देतात. 

महाराष्ट्रात हे अभियान केंद्र शासनाने सुरू करण्याच्या पूर्वीपासून लागू केलेले होते. या अंतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. यासह अ‍ॅनिमियाग्रस्त गर्भवती महिलांना आयर्नचे इंजेक्शन दिले जाते. याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या प्रसूतीदरम्यान दिसून आला आहे.